बीजरोपण केंद्र समस्यांनी ग्रासले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 12:44 AM2018-07-23T00:44:27+5:302018-07-23T00:45:05+5:30
महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे वर्षभर विद्युतपुरवठा खंडित
कामशेत : जुना मुंबई-पुणे महामार्गालगत कामशेतमधील कृषी विभागाचे तालुका बीजगुणन प्रक्षेत्र खडकाळा येथे आहे. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये या खडकाळा बीजगुणन केंद्र विविध समस्यांनी ग्रासले आहे.
एक वर्षापेक्षा जास्त काळ महावितरण मंडळाच्या ढिसाळ कारभारामुळे येथे वीज बंद आहे. त्यामुळे गोळी खत बनवण्याची प्रक्रिया बंद असून, याशिवाय महामार्गाच्या कडेला असलेल्या गटारांमधील सांडपाणी क्षेत्रातील भात शेतीत येत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शेतात काम करण्यास मजूर गेले असता त्यांना त्वचेचा आजार होत आहेत. भात रोपवाटिका यांच्यावरही परिणाम होत आहे. याशिवाय रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, चिखल तुडवत अधिकारी व कर्मचाऱ्यांना चालावे लागत आहे.
मावळात अलीकडच्या काळात आधुनिक पद्धतीने भातलागवडीचे प्रमाण वाढले आहे. त्याच चारसूत्री, एसआरटी़, श्री पद्धत इत्यादी या आधुनिक पद्धतीने भातलागवड केल्यानंतर त्यांना युरिया ब्रिकेटच्या गोळ्याच्या माध्यमातून योग्य प्रमाणात खत द्यावे लागते. यामुळे युरिया ब्रिकेटच्या गोळी खतास विशेष मागणी असते़ हे खत सर्वत्र उपलब्ध होत नाही. बीजगुणन प्रक्षेत्रात उत्तम दर्जाच्या खतांचे मिश्रण करून गोळी खत तयार केले जाते व तयार केलेल्या खताचा वापर कामशेतमधील बीजगुणन प्रक्षेत्रात लावलेल्या पिकांसाठी व परिसरातील शेतकºयांना शेतीसाठी देण्यात येत होते. मात्र सुमारे एक वर्षापासून विद्युत वितरक कंपनीने बीजगुणन प्रक्षेत्रातील विद्युतपुरवठा खंडित केल्याने यावर्षी येथे खताची निर्मिती न झाल्याने शेतकºयांना गोळीखत उपलब्ध होत नाही.
तालुका बीजगुणन प्रक्षेत्र खडकाळा येथे दरवर्षी ४५ ते ५० तन गोळीखत तयार करून त्याचे वितरण केले जाते. पण यावर्षी महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे बीजगुणन प्रक्षेत्राच्या वापरासाठी ११५० किलो गोळी खत बाहेरून आणावे लागले आहे. तर शेतकºयांना तर हे खत तालुक्यात उपलब्धच होत नसल्याने त्यांची मोठी अडचण झाली आहे. तसेच याठिकाणी अनेक शेतमजूर देखील राहत असून, विजे अभावी त्यांना अंधारात राहावे लागत आहे. विजे अभावी अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.