विषय समिती सदस्यांची २० एप्रिलला निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 03:41 AM2018-04-05T03:41:47+5:302018-04-05T03:41:47+5:30
महापालिकेच्या विविध विषय समितीच्या सदस्यांची एप्रिल अखेर मुदत संपणार आहे. त्यामुळे त्यांच्या जागी नवीन सदस्यांची निवड केली जाणार आहे. पक्षीय बलाबलानुसार २० एप्रिलच्या महासभेत विषय समितीच्या सदस्यांची निवड होईल, अशी माहिती नगरसचिव उल्हास जगताप यांनी दिली.
पिंपरी - महापालिकेच्या विविध विषय समितीच्या सदस्यांची एप्रिल अखेर मुदत संपणार आहे. त्यामुळे त्यांच्या जागी नवीन सदस्यांची निवड केली जाणार आहे. पक्षीय बलाबलानुसार २० एप्रिलच्या महासभेत विषय समितीच्या सदस्यांची निवड होईल, अशी माहिती नगरसचिव उल्हास जगताप यांनी दिली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत स्थायी समिती व्यतिरिक्त विधी समिती, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती, महिला व बाल कल्याण समिती आणि शहर सुधारणा समिती अशा चार समित्या आहेत. या समितीतील सदस्यांची मुदत एप्रिल अखेरला संपणार आहे. त्यामुळे नवीन सदस्यांची निवड केली जाणार आहे.
या विषय समित्यांची सदस्य संख्या ९ असते. पक्षीय बलाबलानुसार सत्ताधारी भाजपाचे ५, राष्ट्रवादी काँग्रेसचे ३ आणि शिवसेनेचा १ सदस्य प्रत्येक समितीत जाणार आहे. नव्या सदस्यांची निवड एप्रिलच्या महासभेत केली जाणार आहे. त्यानंतर सभापतीपदासाठी निवडणूक घेण्यात येईल. विभागीय आयुक्तांच्या प्रतिनिधीच्या उपस्थितीत सभापतींची निवड होईल. विषय समिती सदस्यपदावर संधी मिळावी, यासाठी नगरसेवकांनी आतापासूनच नेत्यांकडे ‘फिल्डिंग’ लावली आहे.
महापालिकेत सत्तांतर झाले. त्यानंतर स्थायी समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी राजकारण झाले होते. त्यातून राजीनामानाट्यही रंगले होते. मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी केल्यानंतर वादावर पडदा पडला होता. विषय समितीवर कोणाची वर्णी लागणार, याबाबत उत्सुकता आहे. विषय समितीच्या सदस्यांची संख्या नऊ असते. पक्षीय बलानुसार भाजपाचे ५, राष्ट्रवादीचे ३ आणि शिवसेनेचा १ सदस्य असणार आहे. महासभेत निवडणूक झाल्यानंतर सभापतींची निवड होणार आहे. त्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. त्यांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली.