स्वत:साठी माननीयांची ‘सेटिंग’
By admin | Published: February 17, 2017 05:00 AM2017-02-17T05:00:29+5:302017-02-17T05:00:29+5:30
महापालिकेची रणधुमाळी रंगात आली असताना स्वत:ला सेफ करण्यासाठी पिंपरी, चिंचवड आणि भोसरी अशा तीनही मतदारसंघातील वॉर्डात
पिंपरी : महापालिकेची रणधुमाळी रंगात आली असताना स्वत:ला सेफ करण्यासाठी पिंपरी, चिंचवड आणि भोसरी अशा तीनही मतदारसंघातील वॉर्डात सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांंनी खेळी खेळली आहे. विद्यमान नगरसेवक व माननीयांनी पॅनल चालविण्यापेक्षा विविध पक्षाशी सेटिंग केल्याची चर्चा आहे.
महापालिकेची निवडणूक २१ फेब्रुवारीला होणार आहे. निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भारतीय जनता पक्ष, मनसे अशा विविध पक्षांसह ३२ प्रभागांतून १२८ जागांसाठी ७६८ उमेदवार रिंगणात आहेत. प्रथमच चार सदस्यीय पद्धतीने निवडणूक होत आहे. त्यामुळे प्रत्येक प्रभाग मिनी विधानसभा झालेला आहे. एक प्रभाग किमान ४८ ते कमाल ५९ हजार लोकसंख्येचा झालेला आहे. त्यामुळे मतदारापर्यंत पोहोचणे अवघड झाले आहे. कोणत्याही पक्षाने १२८ उमेदवार दिलेले नाहीत. अ, ब, क, ड अशा चार जागांवर उमेदवारी देताना राजकीय पक्षांनी काळजी घेतली आहे.
शहरपातळीवर भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या स्थानिक नेत्यांनी पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तीनही मतदारसंघांत उमेदवारी देताना अॅडजस्टमेंट केली आहे. त्यामुळे मातब्बर नगरसेवक एकमेकांच्या विरोधात आलेले नाहीत. राष्ट्रवादीच्या नेत्यांचे भाजपा आणि शिवसेनेच्या नेत्यांशी, भाजपाचे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी जवळचे संबंध आहेत. त्यामुळे पक्षाची उमेदवारी देताना आपल्या मित्राला त्रास होऊ नये म्हणून दक्षता घेतली आहे. विधानसभेच्या निवडणुकीत भोसरी विधानसभेत राष्ट्रवादीचा अधिकृत उमेदवार असताना राष्ट्रवादीतील एका गटाने अपक्ष उमेदवाराला मदत
केली होती. आता आमदार झाल्यानंतर हेच नेते दुसऱ्या पक्षात गेले. मदत केलेल्या राष्ट्रवादीतील उमेदवारांना त्यांनी अनेक प्रभागांत सेफ केल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)