एकाच जमिनीची अनेकांना विक्री; चौघे गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 02:56 AM2018-06-24T02:56:09+5:302018-06-24T02:56:15+5:30
बनावट कागदपत्रांच्या आधारे एकच जमीन अनेकांना विकून फसवणूक केल्याप्रकरणी चार जणांना वाकड पोलिसांनी गजाआड केले.
पिंपरी : बनावट कागदपत्रांच्या आधारे एकच जमीन अनेकांना विकून फसवणूक केल्याप्रकरणी चार जणांना वाकड पोलिसांनी गजाआड केले. त्यांना २५ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
फसवणूकप्रकरणी संतलाल रोशनलाल यादव (वय ४७, रा. काळेवाडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नथू चिंधू खिलारी (वय ५५), खंडू चिंधू खिलारी (वय ५२, रा. बोरज, मळवली, ता. वडगाव मावळ), बाबासाहेब तोलाजी चितळे (वय ४७), भाऊसाहेब बाबूराव काळे (वय ४५, रा. जोतिबानगर, काळेवाडी) अशी अटक आरोपींची नावे आहेत, तर जितेंद्र रामदास तोरे (वय ४५, रा. जळगाव) हे पसार झाले आहेत. या आरोपींविरुद्ध बनावट कागदपत्रे तयार करणे, खोट्या कागदपत्रांच्या आधारे फसवणूक करणे असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या आरोपींना पिंपरी, मोरवाडी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळेवाडीतील बाबासाहेब चितळे, भाऊसाहेब काळे आणि जितेंद्र तोरे यांनी संतलाल यादव यांना बोरज-मळवली येथील तीन गुंठे जमीन देतो, असे सांगून आठ लाख रुपये घेतले. वडगाव मावळ येथील दुय्यम निबंधक कार्यालयात दस्तनोंदणी करण्यात आली. तथापि, दीड वर्षे त्यांनी जागेचा ताबा देण्याकामी चालढकल केली. याप्रकरणी चौकशी केली असता, जागामालक नथू खिलारी, खंडू खिलारी यांनी यापूर्वीच ती जागा दुसऱ्या व्यक्तीस विक्री केली असल्याचा प्रकार उघडकीस आला.
बनावट सात-बारा, तलाठ्याचा खोटा शिक्का, खोटी स्वाक्षरी असल्याचे दस्तऐवज वापरून आरोपींनी फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. संतलाल यादव यांच्यासह आणखी काही लोकांची आरोपींनी फसवणूक केली असण्याची
शक्यता आहे.