पिंपरीतील राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी घेतली आमदार जगताप यांची भेट; राजकीय चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 01:44 PM2022-08-18T13:44:17+5:302022-08-18T13:45:11+5:30

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील मोठ्या नेत्यांनीच आमदारांच्या गाठी-भेटी सुरू केल्याने शहरात उलटसुलट चर्चा सुरू

Senior NCP leaders from Pimpri met MLA lakshman Jagtap A political debate | पिंपरीतील राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी घेतली आमदार जगताप यांची भेट; राजकीय चर्चांना उधाण

पिंपरीतील राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी घेतली आमदार जगताप यांची भेट; राजकीय चर्चांना उधाण

googlenewsNext

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक येत्या काही दिवसांमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्यात सत्तांतर होण्यापूर्वी शहरामध्ये राजकीय घडामोडींना वेग आला होता. मात्र, राज्यात सत्तांतर होताच इनकमिंग आणि आउटगोईंगचे चक्र स्थिरावले, तर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर पातळीवरील बड्या नेत्यांनी भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे. राज्यात सत्ता बदल होताच या भेटीत नव्या समीकरणांची नांदी तर नाही ना, अशी चर्चा शहरात सुरू झाली आहे.

गेल्या दीड महिन्यापूर्वी राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार कोसळून शिंदे गट व भाजपचे सरकार स्थापन झाले. राज्यात सत्ता बदलताच पिंपरी चिंचवड शहरातील सत्ताधारी असलेल्या पक्षातील नगरसेवकांनी दुसऱ्या पक्षात होणारा आपला प्रवेश थांबवला. ते अजूनही चाचपणी करून याबाबत निर्णय घेणार असल्याचे समजते. मात्र, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील मोठ्या नेत्यांनीच आमदारांच्या गाठी-भेटी सुरू केल्याने शहरात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

नुकतीच भोसरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, प्रशांत शितोळे आणि अपक्ष म्हणून निवडून आलेले नवनाथ जगताप यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांची भेट घेतली. ही भेट आमदार जगताप यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी घेतली असल्याचा दावा या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. मात्र, जगताप यांना रुग्णालयातून घरी आणून तब्बल दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे. त्यापूर्वी अनेक नेत्यांनी येऊन त्यांची भेट घेतली होती. मात्र, आता राज्यातील सत्ता बदलानंतर या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतल्याने राष्ट्रवादीचे हे बडे नेते भाजपच्या वाटेवर आहेत का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

मला मुख्यमंत्रिपद दिले तरी मी भाजपमध्ये जाणे शक्य नाही. आमदार जगताप हे आमचे चांगले मित्र आहे. त्यामुळे त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आम्ही गेलो होतो. मी तर यापूर्वीही रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली होती. त्यामध्ये काही गैर आहे असे मला वाटत नाही. आमच्यापैकी कोणीही भाजपमध्ये जाणार नाही. - संजोग वाघेरे, माजी शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस.

आमदार जगताप हे शहराचे आमदार आहेत. त्यांनी खूप मोठ्या आजाराशी सामना केला आहे. त्यांचे आणि आमचे मैत्रीचे संबंध आहेत. कारण ते यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच होते. त्यामुळे त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आम्ही गेलो होतो. ही राजकीय भेट नव्हती. ते घरी आल्यावर सर्वांना भेटायला लागल्याचे समजल्यावर आम्ही चौकशी करण्यासाठी गेलो होतो. - राजू मिसाळ, माजी विरोधी पक्षनेते.

Web Title: Senior NCP leaders from Pimpri met MLA lakshman Jagtap A political debate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.