ज्येष्ठ रमताहेत विरंगुळा केंद्रात
By admin | Published: November 17, 2016 03:21 AM2016-11-17T03:21:44+5:302016-11-17T03:21:44+5:30
आयुष्यभर कुटुंबासाठी कष्ट करून उतारवयात मनाला शांतता मिळावी, थोडा विरंगुळा व्हावा, यासाठी ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्रे आता शहरात अनेक ठिकाणी उभारण्यात आली आहेत.
भोसरी : ज्येष्ठ नागरिक हे नेहमीच समाजासाठी मार्गदर्शक असतात. आयुष्यभर कुटुंबासाठी कष्ट करून उतारवयात मनाला शांतता मिळावी, थोडा विरंगुळा व्हावा, यासाठी ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्रे आता शहरात अनेक ठिकाणी उभारण्यात आली आहेत. पण पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वांत पहिले व मोठे ज्येष्ठांसाठीचे विरंगुळा केंद्र म्हणजे भोसरीतील सँडविक कॉलनी येथील आदर्श ज्येष्ठ नागरिक संघाचे विरंगुळा केंद्र.
वारकरी परंपरा जपण्यासाठी दर वर्षी ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन केले जाते. सात दिवस ज्ञानेश्वरी वाचन, हरिपाठ, कीर्तन, प्रवचन असे कार्यक्रम होत असतात. वेळोवेळी आरोग्य शिबिरांचे आयोजन केले जाते. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांची नेत्रतपासणी, आरोग्य तपासणी केली जाते. गरज वाटल्यास आॅपरेशन केले जाते व औषधे वाटपही केले जातात. निरामय आरोग्यासाठी नियमित योगसाधनेचे धडे ज्येष्ठांना दिले जातात. याचा चांगला लाभ सभासद, ज्येष्ठ नागरिकांना होताना दिसत आहे.
ज्येष्ठ नागरिक हे समाजाची मोठी संपत्ती आहे. बदलत्या जीवनशैलीत ज्येष्ठांच्या अनुभवाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. समाजातील ज्येष्ठ विचारांना एकत्र आणून त्याच्या आधारासाठी आदर्श ज्येष्ठ नागरिक संघ स्थापला असून, विविध उपक्रम व कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्येष्ठांना आनंद देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे. याचा ज्येष्ठ नागरिकांना चांगला फायदा होत असल्याने समाधान आहे. सँडविक कॉलनीतील शेकडो ज्येष्ठ नागरिकांना एकत्र करून नगरसेवक अजित गव्हाणे यांनी २०१२ मध्ये आदर्श ज्येष्ठ नागरिक संघाची स्थापना केली व कै. धोंडिबा फुगे पाटील क्रीडा संकुलात विरंगुळा केंद्र सुरू करून तब्बल ११०० सभासदांना एकत्र केले. सर्वच सभासद आपल्या घराप्रमाणेच या विरंगुळा केंद्रात रमून जातात. ज्येष्ठांसाठी विविध सोयी येथे पुरवण्यात आल्या आहेत. एक छोटे वाचनालय, प्रथमोपचार केंद्र, पाणपोई, निसर्गरम्य परिसर, सायंकाळी विसावा घेण्यासाठी कट्टा, वॉकिंग ट्रॅक, स्वतंत्र कार्यालय अशा सोयीमुळे ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रात वर्तमानपत्रे, मासिके, पुस्तके वाचत विविध विषयांवर चर्चा करण्यात दंग असतात. (वार्ताहर)