'वरिष्ठ सांगतील त्यांना मिळेल', पिंपरी चिंचवड भाजपच्या शहराध्यक्षपदी नवीन चेहरा, शंकर जगताप यांची माहिती
By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: March 29, 2025 19:35 IST2025-03-29T19:34:48+5:302025-03-29T19:35:22+5:30
शहराध्यक्ष पदाबाबत राज्य पातळीवर निर्णय होतो, तो निर्णय घेण्याचे अधिकार पक्षश्रेष्ठींना आहेत.

'वरिष्ठ सांगतील त्यांना मिळेल', पिंपरी चिंचवड भाजपच्या शहराध्यक्षपदी नवीन चेहरा, शंकर जगताप यांची माहिती
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी सुरू आहेत. सध्या बुथ व मंडल स्तरावरील नियुक्त्या करण्यात येत आहेत. मात्र, शहराध्यक्ष पदाबाबत राज्य पातळीवर निर्णय होतो. तो निर्णय घेण्याचे अधिकार पक्षश्रेष्ठींना आहेत. महिनाभरात भाजपच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी नवा चेहरा असेल, असे स्पष्टीकरण आमदार तथा पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी शनिवारी दिले.
चिंचवड मतदारसंघाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत आमदार जगताप यांनी विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित केलेल्या मुद्यांची पत्रकार परिषदेत माहिती दिली. मतदारसंघाच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे आमदार जगताप यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या अधिवेशनात त्यांनी मतदारसंघातील अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करत, सरकारकडून सकारात्मक पावले उचलली जात असल्याचेही स्पष्ट केले.
भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, सदाशिव खाडे, भाजपचे कार्याध्यक्ष शत्रुघ्न काटे, नामदेव ढाके, माजी नगरसेवक राजू दुर्गे, सुरेश भोईर, राजेंद्र गावडे, मोरेश्वर शेडगे, बाबासाहेब त्रिभुवन, विनायक गायकवाड, अश्विनी चिंचवडे, शेखर चिंचवडे आदी उपस्थित होते.
नवीन चेहरा कोण?
नवीन शहराध्यक्षपदी कोणता चेहरा असेल, या प्रश्नावर आमदार शंकर जगताप यांनी वरिष्ठ सांगतील त्यांना शहराध्यक्षपद मिळेल, असे सांगत उत्तर देण्याचे टाळले.