उड्डाणपुलाच्या चुकांची मालिका सुरूच
By admin | Published: April 17, 2015 12:43 AM2015-04-17T00:43:33+5:302015-04-17T00:43:33+5:30
शहरातील वाहतूककोंडी फोडण्यासाठी महापालिकेकडून उभारल्या जाणाऱ्या उड्डाणपुलांच्या चुकांची मालिका अद्यापही सुरूच आहे.
पुणे : शहरातील वाहतूककोंडी फोडण्यासाठी महापालिकेकडून उभारल्या जाणाऱ्या उड्डाणपुलांच्या चुकांची मालिका अद्यापही सुरूच आहे. हडपसर-सासवड रस्त्यावर बांधण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाचा आराखडा चुकला असून सुधारित आराखड्यानुसार, पूल पूर्ण करण्यास तब्बल १ कोटी ८२ लाखांचा वाढीव खर्च येणार आहे. विशेष म्हणजे, या पुलाचे काम ७० टक्के पूर्ण झाल्यानंतर आराखडा चुकल्याचे निदर्शनास आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यामुळे सुधारित आराखड्यास पुलाचा वाढीव निधी देण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडून स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे.
हडपसर गाडीतळावरील वाहतूककोंडी फोडण्यासाठी महापालिकेकडून हडपसर-सोलापूर रत्यावर यापूर्वीच पूल उभारण्यात आला आहे. मात्र, त्यानंतरही वाहतूककोंडी कायमच असल्याने पालिका प्रशासनाकडून या पुलाला समांतर आणि या पुलाच्या वरून हडपसरकडे जाण्यासाठी नवीन पूल बांधण्याचे काम महापालिकेने २०११मध्ये सुरू केले होते. त्यानुसार, या पुलाला २४ कोटी ९९ लाखर रुपयांची निविदा काढून त्याचे काम संबधित ठेकेदाराला देण्यात आले होते. त्यानुसार, गेल्या तीन वर्षांत तब्बल ७० टक्के काम पूर्ण झाले असून, आतापर्यंत १९ कोटी रुपयांचा खर्चही झालेला आहे. असे असतानाच जुन्या पुलावरून हडपसरच्या दिशेने जोडल्या जाणाऱ्या अंतिम टप्प्यात पुलासाठी टाकण्यात आलेले खांब चुकले असल्याची बाब निदर्शनास आली. त्यानंतर यासाठी टाकण्यात आलेल्या खांबांची तपासणी आयआयटी मुंबईकडून करण्यात आली असता, त्यांनी प्रस्तावित खांबांच्या जागेत बदल करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे वाढीव १ कोटी ८२ लाख ८२ हजार रुपयांचा खर्च येईल. त्याबाबतचा प्रस्ताव स्थायीसमोर ठेवण्यात आला असून, आज होणाऱ्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल.
महापालिकेकडून या पुलाचे काम जवळपास तीन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले आहे. त्यानंतर आता हे काम ७० टक्के पूर्ण झाल्यानंतर टाकलेल्या खांबांमध्ये चुका असल्याचे संबधितांच्या नजरेस आल्या त्यावर पर्याय म्हणून इतर बाबींचाही विचार करण्यात आला. मात्र, हे खर्चिक असल्याने या पुलाची तपासणी आयआयटीकडून करून घेण्यात आली. त्यांनी आता आणखी खांब उभारण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे आधीच दोष लक्षात आला नाही का, असा सवाल उपस्थित होतो.
चुकीचा भुर्दंड पुणेकरांच्या माथी का ?
४महापालिकेकडून उड्डाणपूल अथवा रस्ते करताना त्यासाठी सल्लागार नेमले जातात. त्यांना या कामांचा सल्ला देण्यासाठी शुल्कही अदा केले जाते. तसेच, या कामांचा खर्च किती होईल, हे ठरविण्यासाठी एस्टीमेट कमिटीही असते. याशिवाय, शहरातील वाहतूक नियोजन प्रकल्पांसाठी अतिरिक्त नगर अभियंता दर्जाचा स्वतंत्र अधिकारीही नेमण्यात आलेला आहे. असे असतानाही या पुलाचे डिझाईन चुकले असल्याने आता तो पूर्ण करण्यासाठी पुणेकरांनी कररूपाने जमा केलेल्या तब्बल २ कोटींचा वाढीव भुर्दंड महापालिकेला सहन करावा लागणार आहे.
४या ठिकाणी शहराच्या वाहतुकीच्या अनुषंगाने हा पूल लवकरात लवकर पूर्ण करणे गरजेचे आहे. मात्र, अशा प्रकारे सदोष काम केल्यामुळे
होणाऱ्या खर्चासाठी महापालिका प्रशासन कोणाला जबाबदार
धरणार की डोळे झाकून या पुलाची चूकही पोटात घालणार, असा सवाल विचारला जात आहे.