सेवा रस्त्यावर पडले खड्डेच खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 01:30 AM2018-08-27T01:30:49+5:302018-08-27T01:31:10+5:30
पवनानगर फाटा : उड्डाणपुलाच्या कामाचा परिणाम
कामशेत : जुना मुंबई-पुणे राष्ट्रीय मार्गावर पवनानगर फाटा येथे सुरूअसलेल्या उड्डाणपुलाच्या कामासाठी काही अंतरावर मार्ग बंद करून मुख्य मार्गावरील वाहने सेवारस्त्याने वळवण्यात आली आहेत. सेवा रस्त्याचे काम पूर्ण करण्याआधीच मार्ग वळवण्यात आल्याने वाहतुकीची समस्या गंभीर बनली आहे. त्यात सेवारस्त्यावर सर्वत्र खड्ड्यांचे व खडीचे साम्राज्य पसरले आहे.
या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून दोन्ही बाजूच्या सेवारस्त्यावर ठिकठिकाणी तळ्याचे स्वरूप आले आहे. महामार्गावर प्रवास करताना वाहनचालकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनपेक्षितपणे पुढे पाण्याने भरलेल्या खड्ड्यात वाहन आदळत आहे, तर खड्डे चुकवण्याच्या नादात अपघाताला आमंत्रण मिळत आहे. रस्त्याकडेला चिखलाचा राडारोडा झाला असून, स्थानिकांना येथून जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे. याबाबत प्रशासनाकडे तक्रार करुनही दखल घेतली जात नाही.
मागील अनेक महिन्यांपासून सुरूअसलेल्या महामार्गावर पवनानगर फाटा येथील उड्डाणपुलाचे काम मे महिन्यात मुदत संपूनही पूर्ण झाले नाही. येथे पवनानगरकडून कामशेतमध्ये येणारे जाणारे नागरिक महामार्ग ओलांडताना अपघातात शेकडो लोकांनी प्राण गमावले. अनेकांना अपंगत्व आले. महामार्ग ओलांडणे नागरिकांच्या जिवावर बेतत असल्याने येथे उड्डाणपूल व्हावा, यासाठी अनेकदा रास्ता रोको व विविध आंदोलने झाली.
त्यातूनच मागील वर्षी जानेवारी महिन्यात येथे उड्डाणपुलाचे काम सुरू झाले. यावेळी स्थानिक नागरिकांसह पवनानगर भागातील सर्व नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र या उड्डाणपुलाच्या कामाची मुदत संपून तीन महिने पूर्ण होत आले, तरी पुलाचे काम पूर्ण होत नसल्याने शिवाय सेवारस्त्यावर पडलेले खड्डे व पसरलेली खडी, सेवारस्त्यावर व कडेला झालेला चिखल, गटारीसाठी खोदलेले मोठे खड्डे आदी समस्यांनी नागरिक त्रस्त आहेत. एक वेळ महामार्ग ओलांडणे परवडत होते पण या सेवारस्त्यावरून चालणे जीवघेणे झाले आहे. चिमुकल्यांना शाळेत सोडण्यासाठी जाणाऱ्या महिला व पालक यांच्यात मोठी भीती निर्माण झाली आहे.
दुचाकीस्वार झाले जायबंदी
कामशेतमधील या उड्डाणपुलाच्या कामी नागरिकांची मोठी परवड होत आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूच्या सेवारस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यात सेवा रस्त्याच्या कडेला गटारीसाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालक व पादचाºयांना मोठी कसरत करावी लागत आहे. या खड्ड्यांमध्ये काही दुचाकीस्वार पडून अपघात झाले आहेत. शिवाय अवजड वाहनांचा अखंड प्रवास सुरू असून, प्रवास करणे जिकिरीचे झाले आहे.
स्थानिक नागरिकांसह पवनानगर भागातील नागरिक व महामार्गावरील वाहनचालक यांना जीवघेणा प्रवास सुरू आहे. त्यामुळेच येत्या काही दिवसांत उड्डाणपुलाच्या कामामध्ये झालेली दिरंगाई, नागरिकांची गैरसोय, कामाची क्वॉलिटी व सुरक्षा आदी समस्यांच्या विरोधात कामशेत विकास संघर्ष समिती यांच्यामार्फत मोठे आंदोलन करण्यात येणार असल्याची चर्चा कामशेत परिसरात सुरू आहे.