‘एक खिडकी’सह भरारी पथके स्थापन; लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 02:01 AM2019-03-16T02:01:56+5:302019-03-16T02:02:17+5:30

आदर्श आचारसंहितेची होणार काटेकोर अंमलबजावणी

Setting up of 'Flying Squad with a window'; Administration ready for Lok Sabha elections | ‘एक खिडकी’सह भरारी पथके स्थापन; लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

‘एक खिडकी’सह भरारी पथके स्थापन; लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

Next

- नारायण बडगुजर 

पिंपरी : लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांना प्रचारासाठी आवश्यक परवानगी मिळण्यासाठी ‘एक खिडकी योजना’ भोसरी येथे सुरू करण्यात आली आहे. आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन होण्यासाठी भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत.

निवडणूक काळात गैरप्रकार रोखण्यासाठी निवडणूक विभागाकडून कसोशीने प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच उमेदवार आणि मतदारांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर आहे. त्याचाच एक भाग म्हणून एक खिडकी योजना सुरू करण्यात आली आहे. शिरूर मतदारसंघातील भोसरी विभागासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.

राजकीय पक्ष आणि संबंधित उमेदवारांनी सभा, मेळावा, रॅली, प्रचाराची वाहने आदींबाबत परवानगी घेणे बंधनकारक आहे. यासाठी भोसरीच्या निवडणूक विभागाच्या कार्यालयात ही ‘एक खिडकी’ सुरू केली आहे. निवडणूक काळात वाहनांचीही कसून तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी भोसरी विभागात महत्त्वाच्या ठिकाणी ‘चेक पोस्ट’ तयार करण्यात आले आहेत. त्यासाठी स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम (एसएसटी) स्थापन करण्यात आल्या आहेत. एका दिवसाला दोन शिफ्टमध्ये ही टीम काम करेल. एका शिफ्टमध्ये तीन पथके काम करतील. त्यासाठी सहा पथके नियुक्त करण्यात आली आहेत.

प्रचार : व्हिडिओ शूटिंगद्वारे वॉच...
निवडणूक काळात राजकीय पक्षांच्या सभा, मेळावे, रॅली होतात. त्यात आचारसंहितेचे पालन होत आहे किंवा नाही, तसेच सदरच्या कार्यक्रमासाठी संबंधित उमेदवाराने निवडणूक विभागाकडे नमूद केलेला खर्च आणि प्रत्यक्षात केलेला खर्च यात तफावत आहे का, याची पाहणी आणि पडताळणी करण्यात येत आहे. त्यामुळे अशा कार्यक्रमांचे छायाचित्रण अर्थात व्हिडिओ शूटिंग करण्यात येत आहे. त्यासाठीही पथक नियुक्त करण्यात आले आहे. एक अधिकारी आणि व्हिडिओग्राफर आदींचा यात समावेश आहे.

अंमलबजावणीसाठी चार फ्लाइंग स्कॉड
आचारसंहितेचे काटेकोर पालन होणे आवश्यक आहे. मात्र त्याचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्यास तत्काळ कारवाई करण्यासाठी फ्लाइंग स्कॉड अर्थात भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. भोसरी विभागात अशी चार पथके राहणार आहेत. निवडणूक विभागाचा उपअभियंता या पथकाचा प्रमुख राहणार आहे. यात एका पोलीस उपनिरीक्षकासह अन्य काही कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.

निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी म्हणून खबरदारी घेण्यात येत आहे. त्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा यासाठी निवडणूक विभाग प्रयत्नशील आहे.
- रेश्मा माळी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, भोसरी विभाग

Web Title: Setting up of 'Flying Squad with a window'; Administration ready for Lok Sabha elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.