Pimpri Chinchwad: ‘मोक्का’तील सात आरोपींच्या आवळल्या मुसक्या; गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 08:09 PM2023-03-30T20:09:36+5:302023-03-30T20:11:43+5:30
पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने ही कारवाई केली...
पिंपरी : महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का ) मधील पाहीजे असलेल्या सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली. तसेच एका विधीसंघर्षित मुलाला ताब्यात घेतले. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने ही कारवाई केली.
रोहीत शिवपुत्र कांबळे ऊर्फ सोनकांबळे (वय १९), संकेत लहु मडिखांबे (वय २१), हर्षल विठ्ठल धुमाळ (वय २२), क्रतिक गोरख शिंदे (वय २२), शन्या ऊर्फ शाम सुभाष कांबळे (वय १९, सर्व रा. तळेगाव दाभाडे, ता. मावळ) आणि नीलेश खंडू गायखे (वय ३५, मु. खामशेत, पो. कामशेत, ता. मावळ), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खून प्रकरणातील व भारतीय हत्यार कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यातील तसेच मोक्कातील पाहिजे आरोपी रोहित कांबळे हा तळेगाव दाभाडे येथील जिजामाता चौक येथे आला आहे, अशी माहिती युनिट पाचच्या पथकाला मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी सापळा लावला. त्यावेळी पोलिसांना पाहून आरोपी गल्लीबोळातून पळून जाऊ लागला. त्यामुळे पोलिसांना त्याचा संशय आला. त्याचा पाठलाग करून पोलिसांनी त्याला शिताफीने पकडले. पोलिसांनी चौकशी केली असता राेहित कांबळे याने गुन्ह्याबाबत कबुली दिली. तसेच इतर आरोपींबाबत त्याच्याकडे विचारणा केली. त्यानंतर पोलिसांनी संकेत मडीखांबे, हर्षल धुमाळ त्रतिक शिंदे यांच्यासह एका विधीसंघर्षीत मुलाला ताब्यात घेतले.
तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या प्रयत्नाचा गुन्ह्यातील व ‘मोक्का’मधील पाहिजे आरोपी शन्या ऊर्फ शाम कांबळे याला तळेगाव दाभाडे परिसरातून ताब्यात घेतले. तसेच या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी नीलेश गायखे याला कामशेत येथून ताब्यात घेतले. गुन्हे शाखा युनिट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज खंडाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राहुल कोळी यांच्या पथकाने ही कामगिरी केली.