लोखंडासह ट्रक चोरी केल्याप्रकरणी सात जणांना अटक, शिक्रापूर-तळेगाव रस्त्यावर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2020 07:47 PM2020-09-02T19:47:15+5:302020-09-02T19:47:33+5:30
चालक व क्लिनर यांना मारहाण करून त्यांचे हातपाय बांधून त्यांच्याकडील ३२ टन लोखंड असलेला ट्रक चोरून नेला.
पिंपरी : चालक व क्लिनर यांना मारहाण करून त्यांचे हातपाय बांधून त्यांच्याकडील ३२ टन लोखंड असलेला ट्रक चोरून नेला. शिक्रापूर-तळेगाव रस्त्यावर मंगळवारी (दि. १) पहाटे पाचच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी सात जणांना पोलिसांनीअटक केली.
सतीश मारुती पाटील (वय ३१, रा. लांडेवाडी झोपडपट्टी, भोसरी), विशाल अरुण कांबळे (वय ३०, रा. चिखली गावठाण), बळीराम सदाशिव आलदे (वय २२, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी), पंकज गौतम वाघ (वय २२, रा. चिखली गावठाण), योगेश शहाजी डोकेफोडे (वय १८, रा. तळवडे), अशोक गणपत कांबळे (वय २५, रा. चिखली), मंगेश शिवाजी लोखंडे (वय ३५, रा. चिखली गावठाण) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी ब्रिजेशकुमार मोतीलाल विश्वकर्मा (वय २८, रा. कापसी, नागपूर, मूळ रा. तरावरा, ता. महुगंज, जि. रिवा, मध्य प्रदेश) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ब्रिजेशकुमार आणि त्यांचा क्लीनर शिवनारायण विश्वकर्मा असे दोघेजण जालना येथून ट्रकमध्ये लोखंड घेऊन तळेगाव येथे पोहोच करण्यासाठी जात होते. त्यांचा ट्रक शिक्रापूर-तळेगाव रस्त्याने जात असताना रासे परिसरात आरोपी यांनी त्यांचा ट्रक अडविला. ब्रिजेशकुमार आणि शिवनारायण या दोघांना हाताने मारहाण करून तोंडाला चिकटपट्टी चिटकवून चारचाकी वाहनात बसविले. ३२ टन लोखंड आणि ट्रक असा एकूण २२ लाख तीन हजार १५९ रुपयांचा ऐवज चोरून नेला.
आरोपी यांनी लोखंड असलेला ट्रक नाशिक रस्त्यावरील गोडाऊन चौक येथे आणला. तेथे कोणाची तरी प्रतीक्षा करीत आरोपी थांबले आहेत, अशी माहिती पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस कर्मचारी विशाल भोईर यांना मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांच्या मार्गदर्शनानुसार सापळा लावून पोलिसांनी आरोपी यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून लोखंडासह ट्रक ताब्यात घेतला. त्यानंतर आरोपी यांना चाकण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.