पिंपरी-चिंचवड हादरले! शहरात सात दिवसात सात खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:01 PM2021-09-23T16:01:42+5:302021-09-23T16:10:33+5:30
खुनाच्या घटनांनी पिंपरी चिंचवड शहर हादरले आहे. गेल्या सात दिवसांमध्ये शहरात खुनाचे सात प्रकार उघडकीस आले आहेत
पिंपरी : खुनाच्या घटनांनी पिंपरी चिंचवड शहर हादरले आहे. गेल्या सात दिवसांमध्ये शहरात खुनाचे सात प्रकार उघडकीस आले. दररोज एक खून होत असल्याने शहरवासीयांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गेल्या तीन दिवसांपासून रोज खुनाचे प्रकार घडत आहेत. नात्यातील व ओळखीच्या व्यक्तींकडून हे गुन्हे केले जात आहेत. यात देहूरोड येथील नवविवाहित तरूणीला दोन जणांनी दर्शनासाठी घोरावडेश्वर डोंगरावर नेले. तेथे एकाने तिच्यावर बलात्कार केला. दुसऱ्याने शरीर सुखाची मागणी केली. त्याला तिने विरोध केला. त्यामुळे त्याने तिचा निर्घृण खून केला.
रावेतच्या जाधव वस्ती परिसरात राहत्या घरात एका महिलेची हत्या करण्यात आल्याची घटना बुधवारी रात्री उघडकीस आली. खैतनबी हैदर नदाफ असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. चारित्र्यावर संशय घेऊन पतीने तिची हत्या केली असल्याचा अंदाज पोलिसानी व्यक्त केला आहे. वाकड, डांगे चौक येथे गुरुवारी सकाळी एक मृतदेह आढळला. रोहन कांबळे (रा. धायरी, पुणे), असे मृताचे नाव आहे. त्याचा खून एका मद्यपीने केला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
सात दिवसातील खुनाच्या सात घटना
१) १६ सप्टेंबरला रावेत या ठिकाणी सौंदव सोमरू उराव या सुरक्षा रक्षक महिलेचा खून करण्यात आला.
कारण - चोराला रोखण्याचा प्रयत्न
२) २० सप्टेंबरला घोराडेश्वर येथे नवविवाहितेची हत्या
कारण - एकाने बलात्कार केला. त्यानंतर दुसऱ्याने शरीर सुखाची मागणी केली. त्याला महिलेने विरोध केल्याने तिचा खून
३) २० सप्टेंबरला निगडीतील ओटा स्कीम येथे भीमराव गायकवाड या व्यक्तीचा खून करण्यात आला
कारण- जुन्या वादातून
४) २१ सप्टेंबरला चिखली या ठिकाणी वीरेंद्र उमरगी या व्यक्तीचा त्याच्या राहत्या घरी खून करण्यात आला.
कारण - पैशाचे व्यवहार
५) २१ सप्टेंबरला हिंजवडीतील सूस या ठिकाणी अच्युत भुयाना या सुरक्षा रक्षकाचा खून करण्यात आला
कारण - पत्नीबाबत अश्लील कमेंट केल्याने खून
६) २२ सप्टेंबरच्या रात्री खैतनबी नदाफ या महिलेचा रावेत या ठिकाणी खून करण्यात आला.
कारण - चारित्र्यावर संशय घेऊन पतीने केली हत्या
७) २३ सप्टेंबरला डांगे चौक, वाकड येथे रोशन कांबळे (रा. धायरी, पुणे) याचा खून
कारण - अस्पष्ट