महापालिकेने बांधलेले सात गाळे धूळ खात पडून
By admin | Published: April 26, 2017 03:48 AM2017-04-26T03:48:41+5:302017-04-26T03:48:41+5:30
महापालिकेच्या वतीने किवळे येथील मुकाई चौकात उभारण्यात आलेल्या बीआरटी बस टर्मिनलचे एकोणीस महिन्यांपूर्वी लोकार्पण झाले़
किवळे : महापालिकेच्या वतीने किवळे येथील मुकाई चौकात उभारण्यात आलेल्या बीआरटी बस टर्मिनलचे एकोणीस महिन्यांपूर्वी लोकार्पण झाले़ या ठिकाणी प्रवाशांच्या व कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी बांधण्यात आलेले सात गाळे अद्यापही बंद असून, प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.
महापालिकेने किवळे - सांगवी बीआरटी मार्गावर किवळेतील मुकाई चौकात सुमारे एक कोटीहून अधिक रक्कम खर्च करून उभारलेले सुसज्य बस टर्मिनल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते एकोणीस महिन्यांपूर्वी (५ सप्टेंबरला २०१५) लोकार्पण करण्यात आले आहे. येथून मनपा भवन, पुणेसाठी सकाळी सहापासून रात्री अकरापर्यंत दर दहा मिनिटांनी बससेवा उपलब्ध केली असल्याने परिसरातील व नजीकच्या ग्रामीण भागातील प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. या ठिकाणी पीएमपी प्रशासनाच्या वतीने पास केंद्रही सुरू करण्यात आलेले आहे. परिणामी प्रवाशांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली असून, पीएमपी प्रशासनाने वेळोवेळी जाहीर केलेल्या प्रवाशांच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. किवळे बस टर्मिनल उभारताना प्रामुख्याने प्रवाशांना लागणाऱ्या वस्तूंची तातडीने उपलब्धता होण्यासाठी प्रामुख्याने वर्तमानपत्र, साप्ताहिके, पाक्षिक व मासिके विक्री केंद्र , अल्पोपाहार केंद्र, प्रवासात लागणाऱ्या किरकोळ वस्तू विक्री केंद्र, शीतपेये विक्री केंद्र आदी वस्तू विक्री व अन्य सेवा केंद्रांसाठी एकूण सात गाळ ेमहापालिकेच्या वतीने बांधण्यात आलेले आहेत.
आजमितीला सर्व सातही गाळे बंद स्थितीत आहेत. दरम्यान, ताब्यात दिलेले चार गाळे तातडीने सुरू होणे अपेक्षित असून, ताबा देऊन तेरा दिवस उलटले असताना एकही गाळा सुरू करण्यात आलेला नसून, हे चारही गाळे कधी सुरू होणार याबाबत प्रशासनाकडे कोणतीही माहिती उपलब्ध नाही. गाळे बंद असल्याने या ठिकाणी येणाऱ्या प्रवाशांची तसेच पीएमपी सकाळ व दुपार पाळीतील कर्मचारी व अधिकारी यांची गेल्या एकोणीस महिन्यांपासून मोठी गैरसोय होत आहे. सकाळी सहा वाजता येथून बस सेवा सुरू झाल्यानंतर या ठिकाणी वर्तमानपत्रे, चहा, अल्पोपाहार आदी मिळत नसल्याची तक्रार प्रवाशांनी व पीएमपीच्या कर्मचाऱ्यांनी केली आहे.(वार्ताहर)