एका रोपट्याला सतराशे रुपयांचा खर्च; दहा हजार वृक्षांसाठी दीड कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 06:01 AM2018-06-08T06:01:26+5:302018-06-08T06:01:26+5:30
महापालिकेच्या उद्यान विभागामार्फत गतवर्षी पावसाळ्यापूर्वी वृक्षारोपण करण्यासाठी २ मीटर उंचीची ५ हजार आणि मोठ्या आकाराची ५ हजार अशा दहा हजार रोपांच्या खरेदीसाठी एक कोटी ७० लाख रुपयांच्या खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली.
पिंपरी : महापालिकेच्या उद्यान विभागामार्फत गतवर्षी पावसाळ्यापूर्वी वृक्षारोपण करण्यासाठी २ मीटर उंचीची ५ हजार आणि मोठ्या आकाराची ५ हजार अशा दहा हजार रोपांच्या खरेदीसाठी एक कोटी ७० लाख रुपयांच्या खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली. एका झाडाला प्रशासन १७०० रुपये मोजणार असल्याविषयी आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
स्थायी समिती सभेच्या अध्यक्षस्थानी ममता गायकवाड होत्या. महापालिकेच्या उद्यान, वृक्षसंवर्धन विभागामार्फत दरवर्षी पावसाळ्यापूर्वी वृक्षारोपण केले जाते. यंदा ६० हजार रोपांची लागवड करण्याचे नियोजन केले आहे. त्यामध्ये रस्त्याच्या कडेने, मोकळ्या जागा, स्मशानभूमी, दफनभूमी, मैदाने, शाळा, पाण्याच्या टाकीच्या कडेने, धार्मिक ठिकाणी, मंडई इत्यादी ठिकाणी १२ हजार ३०३ रोपे, विकसित उद्याने, विकसनशील उद्याने ५२०५, रेल्वे लाईनच्या कडेने मेट्रोमार्फत ४ हजार, मिलिटरी हद्दीमध्ये ३० हजार, रोपवाटीकेमधून नागरिकांसाठी ६४९२ विक्री तसेच वाटप, हाउसिंग सोसायटी २ हजार अशी विविध स्वरूपात ६० हजार रोपांची लागवड करण्याचे उद्यान विभागाचे नियोजन आहे.
रोपे खरेदी करण्यासाठी पालिकेने निविदा मागविल्या होत्या. मे. न्यू. गार्डन गुरुज फार्म अँड नर्सरी, मे. निसर्ग लण्डस्केप सर्व्हिसेस आणि मे. बी. व्ही. जी़ इंडिया लिमिटेड अशा तीन निविदा पालिकेकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी मे. न्यू. गार्डन गुरुज फार्म अँड नर्सरी यांची निविदा ३.५० टक्के अशी सर्वांत कमी दराची आहे. त्यामुळे स्वीकृत करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना मोठी रोपे पुरवून लागवड करून एक वर्ष देखभाल करण्यासाठी १ कोटी ३६ लाख ९० हजार १६२ रुपये देणार आहेत.
ऐनवेळी दिली मान्यता
वृक्ष लागवडीसाठी रोपे खरेदीच्या ऐनवेळचा विषयास स्थायी समितीने मान्यता दिली. तसेच दोन मीटर उंचीची रोपे खरेदी करण्यासाठी याच ठेकेदाराला ३१ लाख ४२ हजार रुपये देण्यात येणार असून, त्या प्रस्तावाला देखील स्थायी समितीने मान्यता दिली.