पवनेचे प्रदुषण रोखण्याठी मैला शुध्दीकरण प्रकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 11:17 PM2021-05-23T23:17:31+5:302021-05-23T23:17:49+5:30
चिंचवड आणि वाल्हेकरवाडीला केंद्र. केशवनगर आणि वाल्हेकरवाडी येथील अस्तित्वातील पंपींग स्टेशनच्या जागा या जलसंपदा विभागाने दर्शविलेल्या निळया पूररेषेच्या अंतर्गत येत आहेत.
पिंपरी : पवनेचे प्रदूषण रोखण्यासाठी चिंचवड आणि वाल्हेकरवाडी येथे महापालिकेच्या वतीने मैलाशुृघ्दीकरण केंद्र उभारण्यात येणार आहे. राज्य सरकारकडून डिसेंबर २०२० मध्ये नव्याने आलेल्या एकात्मिक सर्वसमावेशक विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावलीनुसार जलसंपदा विभागाने दर्शविलेल्या पूररेषाअंतर्गत हे मैलाशुध्दीकरण केंद्र बांधणे आता शक्य होणार आहे.
पवनेचे वाढते प्रदूषण हा नेहमीच चर्चेचा आणि चिंतेचा मुद्दा राहिला आहे. पवना नदीमध्ये नाल्यांद्वारे थेट मिसळणारे सांडपाणी मैलाशुध्दीकरण केंद्रातून प्रक्रिया करुनच सोडणे अपेक्षित आहे. अद्यापही नदीपात्रात सांडपाणी मिसळण्याचे प्रमाण मोठे आहे.त्यावर उपाययोजना म्हणून चिंचवड - केशवनगर आणि वाल्हेकरवाडी येथे मैलाशुध्दीकरण केंद्र उभारण्यात येणार आहे. चिंचवड येथील मैलाशुध्दीकरण केंद्रासाठी ११ कोटी ५० लाख तर, वाल्हेकरवाडी येथील केंद्रासाठी १२ कोटी रुपयांची अंदाजत्रकीय तरतूद ठेवण्यात येणार आहे.
केशवनगर आणि वाल्हेकरवाडी येथील अस्तित्वातील पंपींग स्टेशनच्या जागा या जलसंपदा विभागाने दर्शविलेल्या निळया पूररेषेच्या अंतर्गत येत आहेत. राज्य शासनाच्या डिसेंबर २०२० मध्ये नव्याने आलेल्या एकात्मिक सर्वसमावेशक विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावलीनुसार जलसंपदा विभागाने दर्शविलेल्या पुररेषा अंतर्गत नवीन मैलाशुध्दीकरण केंद्र बांधणे आता शक्य होणार आहे. चिंचवड आणि केशवनगर ,सर्व्हे क्रमांक २९२ येथे ९५० चौरस मीटर क्षेत्रात महापालिकेचे पंपींग स्टेशन अस्तित्वात आहे. सद्यस्थितीत केशवनगर आणि आजूबाजूच्या भागातील मैलापाणी पवना नदी किनारी असलेल्या केशवनगर पंपींग नलिकेद्वारे पाठविले जाते. केशवनगर पंपींग स्टेशन आवारातच मैलाशुध्दीकरण केंद्र बांधल्याने वीजबचत होणार आहे.
वाल्हेकरवाडी सर्व्हे क्रमांक ८६ येथे ९५० चौरस मीटर क्षेत्रात महापालिकेचे पंपींग स्टेशन अस्तित्वात आहे. सध्या या भागातील मैलापाणी गोखले पार्क पंपींग स्टेशनद्वारे भाटनगर मैलाशुध्दीकरण प्रकल्पात पाठविण्यात येते. या भागातील मैलापाणी गुरुत्व वाहिनीद्वारे (ग्रॅव्हिटी लाइन) गोखले पार्क पंपींग स्टेशनपर्यंत, गोखले पार्क पंपींग स्टेशनपासून पंपींग नलिकेद्वारे भाटनगर मैलाशुध्दीकरण प्रकल्प येथे पाठविण्यात येते. मैलापाणी नदीलगत असलेल्या ग्रॅव्हिटी लाइनद्वारे आणि पंपींग नलिकेद्वारे मैलाशुध्दीकरण प्रकल्प येथे पाठवित असताना मलनिस्सारण नलिकेतून अनेक ठिकाणी गळती होते.मैलापाणी पवना नदीत मिसळून नदीचे प्रदूषण वाढत आहे. वाल्हेकरवाडी आणि आजूबाजूच्या भागातील मैलापाणी गोखले पार्क पंपींग स्टेशनद्वारे भाटनगर मैलाशुध्दीकरण प्रकल्प येथे पाठविण्यात येते . त्यासाठी येणारा खर्च, मलनिस्सारण नलिकांच्या देखभाल दुरुस्तीचा होणारा खर्च पाहता वाल्हेकरवाडीला स्वतंत्र मैलाशुध्दीकरण केंद्र उभारण्यात येणार आहे.