गावोगावचे सांडपाणी थेट नदीत

By admin | Published: May 10, 2017 04:03 AM2017-05-10T04:03:23+5:302017-05-10T04:03:23+5:30

पवन मावळाची वरदायिनी समजली जाणारी पवना नदी शहरी भागाकडे जात असताना प्रदूषणाच्या विळख्यात सापडू लागली आहे.

The sewage of villages directly into the river | गावोगावचे सांडपाणी थेट नदीत

गावोगावचे सांडपाणी थेट नदीत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शिवणे : पवन मावळाची वरदायिनी समजली जाणारी पवना नदी शहरी भागाकडे जात असताना प्रदूषणाच्या विळख्यात सापडू लागली आहे. ठिकठिकाणी सांडपाणी नदीत मिसळत आहे.
पवना धरणातून बारा महिने पाणी मिळत असल्याने पवनेकाठची गावे सुजलाम् सुफलाम् झाली आहेत. या भागातील शेतकरी समृद्ध झाला आहे. परंतु अलीकडे पवनेचे स्वच्छ व सुंदर पाणी दूषित होत असल्याची चर्चा गावोगावी ऐकायला मिळत आहे.
थुगाव येथील नदीत मोठ्या प्रमाणात खडक असल्याने कपडे व गोधड्या धुण्यासाठी परिसरातील महिलांची सकाळीच गर्दी असते. नदीतच गोधड्या व कपडे धूत असल्याने काही प्रमाणात पाणी दूषित होते.
शिवणे व परिसरातील पिंपळखुटे, मळवंडी ढोरे, थुगाव, आर्डव, कडधे, बऊर, करुंज, सडवली व आडे आदी गावांत दुग्ध व्यावसायिक मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांच्याकडे गाय, बैल, म्हैस या जनावरांचे प्रमाणही जास्त आहे.
या जनावरांना पाणी पाजण्यासाठी थेट नदीत सोडले जाते. नदीतच त्यांना आंघोळ घातली जाते. त्यामुळेही पाणी दूषित होते. पावसाळ्यात तर डोंगरावरील दगड, माती वाहून ओढ्या-नाल्यातील घाण पाण्यावाटे थेट नदीपात्रात येते.
नदीकाठच्या गावातील गटाराचे पाणी थेट नदीत सोडले जाते. प्रदूषित होत असलेले पाणी नदीतून नळाद्वारे थेट पाणी पिण्यासाठी वापरावे लागते. कारण कोणत्याही गावात फिल्टर बसवलेले नसल्याने येथील नागरिकांना हेच पाणी प्यावे लागते. त्यामुळे वारंवार आजारी पडण्याचे प्रमाण पावसाळ्यात अधिक प्रमाणात आढळते.
नदी किनारी कपडे धुण्यासाठी आणि जनावरांसाठी वेगळी व्यवस्था करण्याची गरज असून, गावोगावी सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पांची आवश्यकता आहे.
सध्यातरी या विभागात पवनेचे पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित होईल असे कारखाने किंवा प्रकल्प नाहीत. परंतु या विभागात बौर एमआयडीसी प्रकल्प मंजूर झाला आहे. त्यामुळे प्रदूषण वाढण्याची शक्यता आहे.

Web Title: The sewage of villages directly into the river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.