वाकड येथे जीवे मारण्याची धमकी देऊन लैंगिक सुखाची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2018 03:29 PM2018-09-12T15:29:35+5:302018-09-12T15:33:48+5:30
व्हॉटस अप, फेसबुक या सोशल मीडियाद्वारे महिलेकडे लैंगिक सुखाची मागणी केली आणि ती मान्य न केल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली.
वाकड : जीवे मारण्याची धमकी देत शरीर सुखाची मागणी करणाया आरोपी विरुद्ध वाकडपोलिसांकडेविनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. वाहनावर चालक म्हणून काम करत असलेल्या आरोपीने मालकिणीला शिवीगाळ करून चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. त्यात तो तुरुंगातही जाऊन आला. तुरुंगातून जामिनावर आलेल्या विकृताने माहिलेशी मोबाईलवर संपर्क साधला. सोशल मीडियाद्वारे अश्लील चॅट करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी वाकड ठाण्यात २७ वर्षीय महिलेने फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी रविंद्र बाजू जगताप (वय ३०, रा. तापकीर नगर, काळेवाडी) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्याकडे आरोपी हा वाहनचालक म्हणून नोकरी करत असताना जुलै महिन्यात हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहन थांबवून त्याने मालकिणीसोबत बाचाबाची व शिवीगाळ करून चाकुने हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. याबाबत हिंजवडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्याला अटकही झाली. मात्र, जामिनावर बाहेर येताच त्याने पुन्हा वेगवेगळ्या मोबाईलवरून फोन करून तसेच व्हॉटस अप, फेसबुक या सोशल मीडियाद्वारे महिलेकडे लैंगिक सुखाची मागणी केली आणि ती मान्य न केल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली. पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.