शगून चौकात वाहतूककोंडी
By admin | Published: September 4, 2016 04:13 AM2016-09-04T04:13:02+5:302016-09-04T04:13:02+5:30
गणेशोत्सवासाठी बाजारपेठेत गर्दी असताना त्यात अवजड वाहने रस्त्यातच उभी असल्यामुळे शनिवारी शगून चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली. वाहनांच्या लांबच लांब रांगा
पिंपरी : गणेशोत्सवासाठी बाजारपेठेत गर्दी असताना त्यात अवजड वाहने रस्त्यातच उभी असल्यामुळे शनिवारी शगून चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतूक पोलिसांची ही कोंडी सोडविताना दमछाक झाली. तर खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना रस्ता ओलांडण्यासाठीदेखील जागा नसल्यामुळे मानसिक त्रास सहन करावा लागला.
गणेशोत्सव उद्यावर येऊन ठेपल्याने पिंपरीतील शगून चौकातील बाजारपेठेत गेल्या दोन दिवसांपासून खरेदीसाठी नागरिकांची वर्दळ सुरू आहे. गणेशोत्सवाबरोबरच हरतालिका व ऋषीपंचमी हे महिलांचे सण आल्याने शनिवारी बाजारपेठेत सकाळपासून गर्दी झाली होती. बहुतांश व्यावसायिकांनी सजावटीचे साहित्य दुकानाबाहेरच विक्रीला ठेवले असून, त्यात किरकोळ विक्रेत्यांनीदेखील रस्त्यांवर हातगाड्या उभ्या केल्या होत्या. तर माल पोहचविण्यासाठी आलेली अवजड वाहने रस्त्यातच उभी राहिल्यामुळे या कोंडीत अधिकच भर पडली. रस्त्यातच ट्रक उभा करून एका व्यावसायिकांचा माल उतरविण्यात येत होता. तर रस्त्याच्या दुसऱ्या कडेलादेखील एका छोट्या टेम्पोमधून एका व्यावसायिकाचा माल उतरविण्यात येत असल्यामुळे काळेवाडीकडून येणाऱ्या वाहनांना वाहन काढताना अडचणींचा सामना करावा लागत होता. नागरिकांनी रस्त्यातच मोटारी उभ्या केल्यामुळे वाहतूक संथ गतीने सुरू होती.
दरम्यान, माल पोहोचविण्याठी आलेल्या वाहनधारकाला या पोलिसांनी हटकले, तरीही चालकाने पोलिसांचे न ऐकता माल उतरेपर्यंत रस्त्यावरच वाहन उभे केले. पोलिसांनी कारवाई केली नाही. (प्रतिनिधी)
रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने उभी असल्यामुळे काळेवाडीकडून आलेल्या पीएमपीएल बसला पिंपरीकडे येण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे चालकाला रस्त्याच्या कडेलाच बस उभी करावी लागली आ़णि काही वेळातच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. दरम्यान, प्रवासी व मोटारीदेखील विरुद्ध दिशेने इंदिरा गांधी उड्डाणपुलावरून शगून चौकाकडे येत असल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला कोंडी झाली होती. कोंडी सोडविण्यासाठी तीन वाहतूक पोलीस दाखल झाले. वीस मिनिटांपासून झालेली कोंडी सोडवताना पोलिसांची दमछाक झाली.