"हवा बदलल्यामुळे पवारांची पक्ष विलीनीकरणाची भाषा..." महायुतीच्या प्रचार सभेत देवेंद्र फडणवीसांची टीका
By ज्ञानेश्वर भंडारे | Published: May 11, 2024 10:12 AM2024-05-11T10:12:15+5:302024-05-11T10:13:21+5:30
महायुतीतील राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव यांच्या प्रचारार्थ भोसरीत शुक्रवारी सभा झाली...
पिंपरी : बारामतीचे मतदान झाले आणि शरद पवार यांचे पक्ष विलीनीकरणाचे वक्तव्य आले. त्यामुळे मौसम बदलला आहे. ज्यांंचं दुकान चालत नाही, तेच आपल्या दुकानातील माल दुसऱ्यास विकतात. हवा बदलली आहे, हे शरद पवारांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे ते पक्ष विलिनीकरणाची भाषा करत आहेत. त्याचे ऐकून उद्धव ठाकरे हेही आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील. मात्र, काँग्रेस बुडती नाव आहे, त्यामुळे पक्ष विलीन करायचे असतील तर खऱ्या पक्षांमध्ये करा, असा खोचक टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
महायुतीतील राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव यांच्या प्रचारार्थ भोसरीत शुक्रवारी सभा झाली. यावेळी देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार महेश लांडगे, आमदार अश्विनी जगताप, माजी महापौर राहुल जाधव आदी उपस्थित होते.
पिंपळे सौदागर ते चाकण मेट्रो जोडणार
फडणवीस म्हणाले, पिंपरी-चिंचवड रेडझोनचा विषय आम्ही घेतला आहे. तो सोडवण्यास महायुती कटिबध्द आहे. इंद्रायणी सुधारचे कामही सुरू केले. मेट्रो कनेक्टीव्हीटी शहरात आणली, निगडीपर्यंतच्या मार्गाची निविदा काढली आहे. पिंपळे सौदागर, वाकड ते चाकण पर्यंत आपण मेट्रो आणणार आहोत. पुणे-पिंपरी-चिंचवड बरोबरच प्राधिकरणाच्या हद्दीतील भागही मेट्रोतून जोडणार आहोत. पिंपरी-चिंचवड, पुणे औद्योगिक शहर असूनही वाहतूक समस्या आहे. ती समस्या सोडविण्यासाठी दोन-तीन मजली रस्ते तयार करण्याचे प्रस्ताव तयार केले आहेत. पीएमपीमध्ये इलेक्ट्रिक बस आणल्या, त्यामुळे पर्यावरणपुरक काम करता आल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.
कोल्हे चांगले कलाकार...
समोरचे उमेदवार हे चांगले कलाकार आहेत. ते कलाकार होवू शकतात, खासदार नाही. चोखंदळ रसिक पहिल्यांदा तिकिट काढून सिनेमा पाहतो, मात्र सिनेमा किंवा नाटक फ्लॉप असेल तर ते परत पाहत नाहीत. त्यामुळे यावेळी तो रसिक परत तोच चित्रपट पाहत नाहीत. कोल्हे प्रचारात नाटकांतून निवृत्तीची भाषा करत आहेत. मात्र, निवडणूका झाल्या की ते परत नाटकचं करणार आहेत. खासदार नसतांना आढळराव पाटलांनी निधी आणला. त्यामुळे खासदार म्हणून आढळराव यांना निवडायचे आहेत. त्यामुळे मतदारांनी परत सिनेमा किंवा नाटक पहायचं नाही ठरवलं आहे, असाही विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
विरोधकांकडे नेता, निती आणि नियतही नाही...
फडणवीस म्हणाले, महायुतीच्या विरोधात चोवीस पक्ष एकत्र आले आहेत. तरीही त्यांचा पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरला नाही. महायुतीचे पंतप्रधान मात्र मोदीच आहेत. त्यांच्याकडे नेता, निती आणि नियतही नाही. पाच वर्षात पाच पंतप्रधान करू, असे विरोधकांपैकी एकाने विधान केले. पाच वर्षांत पाच पंतप्रधान संगीत खुर्चीतून बनवणार आहेत का? असा सवालही फडणवीस यांनी केला.