मुंबईतील " ती " चा जगण्यासाठी सासरच्यांशी दीड महिने संघर्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2020 07:00 AM2020-05-10T07:00:00+5:302020-05-10T07:00:12+5:30
लॉकडाऊनमुळे काम बंद झाल्याने तरुणीचा केला छळ
नारायण बडगुजर -
पिंपरी : कोरोनामुळे संपूर्ण जग घरात बंदिस्त आहे. मात्र, काही विकृतांना या महामारीतही पैशांचा हव्यास आहे. कमावत्या सुनेचे काम लॉकडाऊनमुळे बंद झाल्याने तिला घरातील हॉलमध्ये डांबून ठेवत सासरच्यांनी तिचा छळ केला. तिचा फोन हिसकावून घेत तिला अन्नपाणीही दिले नाही. घराबाहेर जग कोरोनाशी लढत असताना ती घरातच दीड महिना जगण्यासाठी घरातील मंडळींशी संघर्ष करीत होती.
मराठवाड्यातील एका गरीब शेतकरी कुटुंबातील बीस्सीपर्यंत शिक्षण झालेल्या तरुणीची ही व्यथा आहे. मुंबई येथील एक तरुणासोबत तिचे लग्न झाले. सासरे मोठे अधिकारी तर पती इंजिनिअर असल्याचे तिला सांगण्यात आले. मात्र, पती कॉम्प्युटर ऑपरेटर तर सासरे सुरक्षारक्षक असल्याचे लग्नानंतर समोर आले. त्यानंतर तिला नोकरी करण्याचे सांगण्यात आले. तिने नोकरी केली. पगाराची रक्कम सासरचे मंडळी ठेवून घेत. मात्र, तरीही तरुणीची कुरबूर नव्हती. मात्र, कोरोनाच्या महामारीमुळे लॉकडाऊन झाले आणि तिचे काम बंद झाले. परिणामी पगार बंद झाला. तू नोकरी करून आम्हाला पैसे द्यावेस म्हणून तुला येथे आणले आहे. मात्र, आता तुझे काम बंद आहे. त्यामुळे तुझ्याकडून आम्हाला पैसे मिळत नाही. तू येथेच रहायचे, असे सांगून सासरच्यांनी तिला घराच्या हॉलमध्ये डांबून ठेवले. तिच्याकडील स्मार्टफोन हिसकावून घेतला. तसेच पुरेसे जेवण व पाणी द्यायचेही बंद केले. माहेरून आणलेला बेसिक मोबाइल फोन तिच्याकडे होता. त्यावरून तिने नातेवाइकांना संपर्क साधला मात्र प्रतिसाद मिळाला नाही. अखेरीस पिंपरी-चिंचवड शहरात असलेल्या तिच्या बहिणीशी तिचा संपर्क झाला. बहिणीला सर्व हकिगत सांगितली.
बहिणीने देखील अनेकांशी संपर्क साधला. राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षा वर्षा जगताप यांना त्यांनी बहीण अडकली असल्याचे सांगितले. त्यानंतर मुंबईतील संबंधित भागातील पोलिसांशी संपर्क साधण्यात आला. पोलिसांनी तरुणीशी संपर्क साधला, तिची व्यथा जाणून घेतली. त्यानंतर एका तासात पोलिसांचे पथक तरुणीच्या घरी पोहोचले. दाराची बेल वाजली आणि तरुणीला हायसे वाटले. दार उघडताच तरुणी पोलिसांसमोर घरातून धावतच बाहेर आली. मला रस्त्यावर सोडा, पण येथून घेऊन चला, अशी विनवणी करून ती तरुणी धाय मोकलून रडत होती.
तरुणीला सोबत घेऊन पोलीस तिच्या घरून निघाले. पोलिसांनी तिच्या राहण्याची व्यवस्था केली. लॉकडाऊन असल्याने प्रवासाचे साधन नव्हते. त्यामुळे वाहनाची व्यवस्था तसेच पास मिळविण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले. त्यात दोन दिवस गेले. त्यानंतर तरुणीला मराठवाड्यातील तिच्या माहेरी पाठविण्यात आले. दरम्यान, तिचे वाहन पिंपरी-चिंचवड शहरातून जात असल्याने वर्षा जगताप यांनी तरुणीची भेट घेतली. तिला जेवणाचा डबा व कपडेदेखील दिले. त्यावेळी तरुणीला अश्रू अनावर झाले. आपण बहिणीला सांगितले. तिच्या सांगण्यावरून तुम्ही मदत केली. त्यामुळे मी जिवंत आहे. तुमच्यामुळे मला नवीन जन्म मिळाला, असे तरुणी म्हणाली.
--------------------
पोलिसांनी दाखविली तत्परता...
तरुणीच्या बहिणीने मला सांगितल्यानंतर मी खासदार सुप्रिया सुळे यांना फोनवरून याबाबत माहिती दिली. तसेच सक्षणा सलगर व आदिती नलावडे यांना संपर्क साधला. त्यांनी मुंबई परिसरातील स्थानिक पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनीही तत्परता दाखवत तरुणीची सुटका केली. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी वाहनाची व्यवस्था करून दिली. त्यामुळे त्या तरुणीला तिच्या वडिलांकडे पाठविण्यात आले. माहेरी पोहोचल्यानंतर स्थानिक पोलिसांकडे याबाबत तरुणी तक्रार करणार आहे. लॉकडाऊनमुळे अनेक संकटे उभी ठाकली आहेत. अशावेळी घरातल्या मंडळींनी सुनेला अशी वागणूक देणे माणुसकीला काळिमा फासणारे आहे, अशी माहिती राष्ट्रवादी युवती शहराध्यक्ष वर्षा जगताप यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.