शिंदे यांची बंडखोरी भाजपाला डोकेदुखी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2019 01:27 AM2019-03-04T01:27:20+5:302019-03-04T01:27:34+5:30
महापालिका स्थायी समिती सभापती निवडणुकीसाठी भाजपाने अधिकृत अर्ज दाखल केला असताना नगरसेवक शीतल शिंदे यांनी बंडखोरी केली आहे.
पिंपरी : महापालिका स्थायी समिती सभापती निवडणुकीसाठी भाजपाने अधिकृत अर्ज दाखल केला असताना नगरसेवक शीतल शिंदे यांनी बंडखोरी केली आहे. भाजपा बंडखोराला राष्टÑवादी काँग्रेसने पुरस्कृत केल्याने भाजपाची अडचण वाढणार आहे.
महापालिका स्थायी समिती सभापतीपदासाठी येत्या गुरुवारी निवडणूक होणार आहे. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शनिवारी भाजपाच्या वतीने गेल्या वर्षभर सुव्यवस्थितपणे स्थायी समिती चालविणाऱ्या जुने आणि निष्ठावान कार्यकर्ते विलास मडिगेरी यांना संधी दिली. त्यामुळे जुने कार्यकर्ते शीतल शिंदे यांनी बंडाचे निशान फडकावले. सभापतीपदासाठी अर्ज भरला आहे. त्यास राष्टÑवादी काँग्रेसचे नगरसेवक सूचक अनुमोदक आहेत. अर्ज भरून आल्यानंतर विरोधीपक्षनेते दत्ता साने यांनी शिंदे यांना पेढा भरविला होता. श्ािंदे यांनी तलवार म्यान केल्यास निवडणूक होण्यासाठी राष्टÑवादीने मयूर कलाटे यांचाही अर्ज ठेवला आहे. त्यामुळे निवड ही बिनविरोध होणार नसल्याचे दिसून येत आहे. भाजपाच्या नगरसेवकाला पुरस्कृत केले आहे का? याबाबत शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांना विचारले असता, दोन्ही उमेदवार आमचेच आहेत. कोण उमेदवार राहणार हे वेळ आल्यावर भूमिका जाहीर करू.
>बंडाळी शमविण्याचे आव्हान
महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यानंतर गेल्या तीनही वर्षी स्थायी समिती सभापतिपदी निवडणुकीत बंडाळी होत असल्याचे दिसून येत आहे. गेल्यावर्षी महापौरांनीच राजीनामा दिला होता. तर यावर्षी या जागेवर भोसरी आणि चिंचवडच्या नेत्यांनी दावा केला होता. सभापती नसतानाही स्थायी समितीचा कारभार व्यवस्थित हाकला म्हणून विलास मडिगेरी यांना सभापतीच्या रूपाने बक्षिसी दिली जात असल्याची चर्चा महापालिकेत आहे.
राष्टÑवादीत अस्वस्थता
प्रसिद्ध अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी राष्टÑवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने शिरूर लोकसभेतील इच्छुकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. राष्टÑवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेस माजी आमदार विलास लांडे, महापालिकेतील विरोधीपक्षनेते दत्ता साने आदी अनुपस्थित होते. वाहतूककोंडी असल्याने लांडे आणि साने पोहचू शकत नसल्याचे वाघेरे यांनी सांगितले. कोल्हे यांच्या प्रवेशाने नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे.