मावळ, शिरूर लोकसभेवरून शिवसेना-भाजपमध्ये धुसफूस; मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याने शिंदे गटाला ताकद
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 09:39 AM2023-06-19T09:39:48+5:302023-06-19T09:40:57+5:30
पिंपरी विधानसभेसाठी अण्णा बनसोडे यांना गळ...
- हणमंत पाटील
पिंपरी :पुणे जिल्ह्यातील चार लोकसभांपैकी प्रत्येकी दोन मतदासंघांचे वाटप भाजप - शिवसेनेत युतीपासूनचे आहे. मात्र, शिवसेनेत फूट पडल्यानंतर आता भाजपने मित्र पक्षाकडील शिरूर व मावळ या दोन्ही लोकसभा मतदारसंघावर, तसेच पिंपरी विधनसभेवरही दावा केला आहे. त्यामुळे युतीत धुसफूस सुरू झाली आहे. राज्यात शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतानाही भाजपकडून पुणे जिल्ह्यात युतीचा धर्म पाळला जात नाही, असे शिंदे गटाचे म्हणणे आहे.
युतीच्या स्थापनेपासून पुण्यातील चार लोकसभा मतदारसंघांचे शिवसेना-भाजपमध्ये समान वाटप झाले आहे. त्यामध्ये पुणे व बारामती लोकसभा भाजपकडे, तसेच शिरूर व मावळ हे शिवसेनेकडे अनेक वर्षांपासून आहेत. मात्र, शतप्रतिशत भाजपची घोषणा आणि फुटीनंतर शिवसेनेची ताकत कमी झाली. पार्श्वभूमीवर भाजप आता शिवसेनेच्या मावळ व शिरूर दोन्ही मतदारसंघावर दावा करू लागली आहे. या दोन्ही मतदार संघात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी भाजपने आमदार महेश लांडगे (शिरूर) व माजीमंत्री बाळा भेगडे (मावळ) यांची समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे. तसेच दोघांनीही पक्षाने संधी दिल्यास लोकसभा लढण्याची तयारी दाखविली आहे. यामुळे शिवसेना शिंदे गटातील मावळचे खासदार श्रीरंग बारणे व शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे अस्वस्थ झाले होते.
या पार्श्भूमीवर थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच पिंपरी चिंचवड दौरा करून शिवसेनेच्या आजी - माजी खासदार यांना ताकद दिली. खासदार श्रीरंग बारणे यांच्या मतदासंघात 'शासन आपल्या दारी' हा कार्यक्रम घेऊन दोन्ही लोकसभेवरील शिवसेनेचा दावा कायम असल्याचा अप्रत्यक्ष संदेश भाजपला दिला आहे.
पिंपरी विधानसभेसाठी अण्णा बनसोडे यांना गळ...
पुणे शहरातील युतीतील आठही विधानसभा मतदार संघ भाजपने खचून घेतले आहेत. तसेच पिंपरी चिंचवड शहरातील तिन्ही विधानसभा मतदार संघात भाजपने तयारी केली आहे. त्यापैकी पिंपरी हा राखीव मतदार संघ शिवसेनेकडे आहे. पण, ही जागा गतपंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादीने जिंकली. त्यामुळे भाजपचे अमित गोरखे यांनी या मतदासंघात तयारी केली आहे. या मतदासंघावरील शिवसेनेचा दावा कायम ठेवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांची नुकतीच भेट घेतली. तसेच त्यांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
पुणे जिल्ह्यातील लोकसभांची सद्यस्थिती
मतदार संघ- खासदार- पक्ष
१) पुणे- दिवंगत गिरीश बापट- भाजप
२) बारामती- सुप्रिया सुळे- राष्ट्रवादी
३) शिरूर- डॉ. अमोल कोल्हे- राष्ट्रवादी
४)मावळ- श्रीरंग बारणे- शिवसेना