बोलू न दिल्याने शिवसेना गटनेत्याने भर सभेत फोडला ग्लास
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2020 05:25 PM2020-02-27T17:25:14+5:302020-02-27T17:26:45+5:30
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांना बोलून न दिल्याने त्यांनी ग्लास फोडून सत्ताधारी भाजपाचा आजच्या सभेत निषेध केला. त्यावरून सत्ताधारी भाजपाने महापौरांचा अवमान झाल्याचा कांगावा करून कारवाईची मागणी केली आहे.
पिंपरी : महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांना बोलून न दिल्याने त्यांनी ग्लास फोडून सत्ताधारी भाजपाचा आजच्या सभेत निषेध केला. त्यावरून सत्ताधारी भाजपाने महापौरांचा अवमान झाल्याचा कांगावा करून कारवाईची मागणी केली आहे. कलाटे यांनी माफी मागावी अशी मागणी भाजपाच्या महिला सदस्यांनी केली आहे. तर ‘‘माई मला आईसारख्या असून महापौर झाल्यापासून त्या आमदार लक्ष्मण जगताप यांच्या रिमोटकंट्रोलने सभागृह चालवित आहेत, विरोधकांचा आवाज दाबत आहे, ग्लास फेकून मारला नाही, फोडून निषेध केल्याचे उत्तर कलाटे यांनी दिले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची फेब्रुवारी महिन्याची तहकूब सभा बुधवारी झाली. महापौर उषा ढोरे सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. विषयपत्रिकेवरील करवाढीच्या प्रस्तावर चर्चा सुरु होती. करवाढीचा विषय असताना शिवसेनेच्या वतीने भूमिका मांडण्याची मागणी तीन वेळा राहुल कलाटे यांनी केली होती. मात्र महापौरांनी संधी न दिल्याने कलाटे संतप्त झाले. महापौरसाहेब तुम्ही विरोधकांचा आवाज दाबण्याचे काम करता, तुमच्याकडून हे अपेक्षीत नाहीत. तरीही बोलू न दिल्याने पाण्याचा ग्लास टेबलवरुन खाली आपटला. महापौरांचा निषेध केला. त्यावर महापौर संतप्त झाल्या. तुम्ही खाली बसा, अन्यथा मला कारवाई करावी लागेल. त्यानंतर सलग दोन मिनिटे चाललेल्या गोंधळाचा फायदा घेत विषय मंजूर केले. तर भाजपाने राहुल कलाटे यांनी महापौरांचा अवमान केल्याचा कांगावा केला. तसेच कलाटे यांनी माफी मागावी अशी मागणी केली.
शिवसेना गटनेते राहुल कलाटे म्हणाले, ‘‘अनुभवी असलेल्या उषा ढोरे महापौर झाल्यापासून महासभेत गोंधळ सुरु आहे. महापौरांची पहिलीच सभा तहकूब झाली होती. दुसरी सभाही गोंधळातच तहकूब झाली होती. मागील काही सभा गोंधळातच पार पडत आहेत. त्यांच्याकडून दादागिरी केली जाते. महापौर ढोरे नव्हे तर आमदार लक्ष्मण जगताप सभागृह चालवितात. त्यांच्या रिमोट कंट्रोलवरच महापौरांकडून सभागृह चालविले जाते. राज्यातील सत्ता गेल्याने भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. करवाढीच्या महत्वाच्या विषयावर महापौर ढोरे यांनी मला बोलू दिले नाही. महापौरांच्या हौदासमोरील रचना देखील बदलले आहे. राजदंडापर्यंत पोहचू नये यासाठी फर्निचर बसवून घेतले आहे.’’
महापौर उषा ढोरे म्हणाल्या, ‘‘कलाटे यांना संधी दिली होती. त्यांचे आजचे वर्तन योग्य नाही. मी कोणावरही अन्याय करीत नाही. त्यांनी वर्तनात सुधारणा करायला हवी. ’’