मतदान केंद्रात गोंधळ; शिवसेनेच्या ठाकरे गटाचे शहरप्रमुख सचिन भोसले यांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 12:56 PM2024-05-14T12:56:28+5:302024-05-14T12:56:38+5:30
मी मतदान करायला गेलो असता मतदान युनिटची जुळवणी चुकीच्या पद्धतीने केल्याचे निदर्शनास आले - सचिन भोसले
पिंपरी : मतदान कक्षात मतदान युनिटची (ईव्हीएम) जुळवणी चुकीच्या पद्धतीने झाली असल्याचे सांगत शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहर प्रमुख ॲड. सचिन सुरेश भोसले (४३, रा. थेरगाव) यांनी मतदान केंद्रात गोंधळ घातला. सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करीत पोलिसांनी भोसले यांना तात्काळ अटक केली. थेरगाव येथे सोमवारी (दि. १३) सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली.
मतदान केंद्राध्यक्ष पीयूष सत्यनारायण भटणाकर (५३, रा. इंदुरी, ता. मावळ) यांनी याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान प्रक्रिया पार पडली. दरम्यान, शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) शहराध्यक्ष सचिन भोसले थेरगाव येथील नागू बारणे शाळेत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी गेले. त्यावेळी मतदान युनिटची जुळवणी चुकीच्या पद्धतीने केली असल्याचे सांगत त्यांनी मोबाइलमध्ये चित्रीकरण केले. मतदान केंद्रात चित्रीकरण करण्यास बंदी असल्याने निवडणूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना अडवले. त्यावेळी त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. त्यावेळी पोलिसांनी भोसले यांना ताब्यात घेत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी भोसले यांना अटक करून न्यायालयात हजर केले. दरम्यान, त्यांची जामिनावर मुक्तता झाली.
मतदान केंद्रावर व्हीव्हीपॅट मशीन व बॅलेट युनिटची जोडणी नियमांनुसार व्यवस्थित होती. फक्त व्हीव्हीपॅटची बाजू चुकीची होती. मात्र, त्यामुळे मतदानावर काहीही परिणाम होणारा नव्हता. संबंधितांनी तक्रार केल्यानंतर मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांनी त्या मशीनची जागा बदलली. त्यानंतरही त्यांनी गोंधळ सुरू ठेवल्याने पोलिसांनी कारवाई केली. - विठ्ठल जोशी, सहायक निवडणूक अधिकारी, चिंचवड विधानसभा मतदारसंघ
सचिन सुरेश भोसले हे नागू बारणे प्रशालेच्या मतदान केंद्रामध्ये मतदानासाठी आले होते. त्यावेळी मतदानाचे मशीन उलट्या क्रमाने लावल्याचा आरोप करत त्यांनी मोबाइलमध्ये चित्रीकरण केले, तसेच मतदान प्रक्रिया राबविणाऱ्या अधिकाऱ्यांशी उद्धट वर्तन करून त्यांना शासकीय कर्तव्य निभावण्यामध्ये अडथळा आणला. त्यामुळे सचिन सुरेश भोसले यांच्यावर कायदेशीर कारवाई केली. - बापू बांगर, पोलिस उपायुक्त, परिमंडळ २
मी मतदान करायला गेलो असता मतदान युनिटची जुळवणी चुकीच्या पद्धतीने केल्याचे निदर्शनास आले. त्याबाबत मी विचारणा केली असता माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला. मी कोणत्याही स्वरूपाचे गैरवर्तन केले नाही. हा प्रकार पोलिसांना तसेच केंद्रप्रमुखांना कळवण्याबाबत विनंती केली होती. मात्र, जाणीवपूर्वक माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला. - ॲड. सचिन भोसले, शहरप्रमुख, पिंपरी- चिंचवड