बैठकीत राडा : शिवसेना महिला पदाधिकाऱ्याला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2019 05:01 AM2019-10-03T05:01:57+5:302019-10-03T05:02:10+5:30
भोसरी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या बैठकीत आजी-माजी पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक खडाजंगी झाली
पिंपरी : भोसरी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या बैठकीत आजी-माजी पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक खडाजंगी झाली. या वेळी शिवसेनेच्या माजी शहरप्रमुखाने विद्यमान महिला जिल्हा संघटिकेस अर्वाच्य शिवीगाळ करीत मारहाण केली. या प्रकरणी निगडी पोलिसांत माजी शहरप्रमुख बाजीराव लांडे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
शहरातील तीनपैकी भोसरी व पिंपरी या मतदारसंघांवर शिवसेनेने दावा केला होता. जागा वाटपात पिंपरी शिवसेनेला व भोसरी भाजपला गेला आहे. शिवसेनेच्या भोसरी मतदारसंघातील पदाधिकाºयांची बैठक इरफान सय्यद यांच्या चिंचवड शाहूनगर येथील कार्यालयात झाली.
कार्यकर्ते मते मांडत असताना माजी शहर प्रमुख बाजीराव लांडे यांनी माजी खासदारांमुळे वाट लागली आहे. त्यांनी पक्षसंघटना संपविली आहे, असा आरोप केला. जिल्हा संघटिका सुलभा उबाळे यांनी त्यांच्या विधानावर आक्षेप घेतला. यामुळे लांडे हे उबाळे यांच्या अंगावर धाऊन गेले आणि थोबाडीत मारून अर्वाच्य शिवीगाळ केली. मध्यस्थी करणाºयांनाही लांडे यांनी धक्काबुक्की करीत मारहाण केली. त्यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी लांडे यांची धुलाई केली.
पोलिसांत गुन्हा दाखल
सुलभा उबाळे यांनी निगडी पोलिसांत फिर्याद दिली आहे. आढळराव यांनी हा मतदारसंघ भाजपाला घालविला. त्यांनी शिवसेनेचे वाटोळे केले, असे लांडे म्हणाले. त्यानंतर वाद वाढत गेला. लांडे यांनी उबाळेंना शिवीगाळ करीत मारहाण केली. मध्यस्थी करणाºया महिलांनाही लांडे यांनी मारहाण करीत शिवीगाळ केली.