शिवसेना कार्यालयावरून जुंपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 01:41 AM2018-08-08T01:41:24+5:302018-08-08T01:41:33+5:30
महात्मा फुले नगरातील शिवसेना कार्यालयावरून माजी पदाधिकारी आणि विद्यमान पदाधिकारी यांच्यात जुंपली आहे.
पिंपरी : महात्मा फुले नगरातील शिवसेना कार्यालयावरून माजी पदाधिकारी आणि विद्यमान पदाधिकारी यांच्यात जुंपली आहे. भाजपाच्या स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे आणि सरचिटणीस सारंग कामतेकर यांनी अर्वाच्य शिवीगाळ व दमदाटी केल्याचा आरोप शिवसेना पिंपरी विधानसभा संघटक जितेंद्र ननावरे यांनी केला आहे. तर आमच्या ताब्यातील मालमत्तेचे कुलूप तोडून बळकावण्याचा प्रकार केला असल्याची तक्रार सावळे आणि कामतेकर यांनी पोलिसांत केली आहे.
एमआयडीसी पोलीस ठाणे, पिंपरी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारीचा अर्ज दिला आहे. तक्रारीची चौकशी करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. महात्मा फुले नगरातील शिवसेना कार्यालय मालमत्ता हक्कावरून आजी माजी पदाधिकाऱ्यांमध्ये जुंपली आहे. ननावरे यांनी पत्रकार परिषद घेऊन कार्यालय आमचेच आहे, असा दावा केला आहे. तसेच सावळे यांनी केलेल्या अर्वाच्य शिवीगाळीची क्लीप माध्यमांना ऐकविली. या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, शहरप्रमुख योगेश बाबर, महिला आघाडी शहर संघटक सुलभा उबाळे, धनंजय आल्हाट, अनंत कोºहाळे, रोमी संधू, संतोष सौंदणकर आदी उपस्थित होते.
ननावरे म्हणाले, ‘‘महात्मा फुलेनगर झोपडपट्टीत ३२ वर्षांपासून शिवसेना शाखा कार्यालय आहे. या शाखेची महापालिकेत शिवसेना कार्यालय अशी नोंद केली आहे. शिवसेनेतर्फे मालमत्ताकरही महापालिकेकडे भरला जात आहे. भाजपा नगरसेविका सावळे आणि कामतेकर यांनी कार्यालयाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, पिंपरी विधानसभा संघटक म्हणून आपण याला तीव्र विरोध केला. तसेच जागेचा ताबा देणार नाही, असे स्पष्ट बजावले. यातून १९ जुलै रोजी त्यांनी मोबाइलवरून शिवीगाळ करत दमदाटी केली. धमक्या दिल्या. ’’
‘‘कार्यालयाच्या कर पावतीची झोपडपट्टी पुनर्वसन व निर्मूलन कार्यालयातही नोंद आहे. त्यासाठी या कार्यालयाचा ताबा शिवसेनेकडे देण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.
दरम्यान मालमत्तेवर सारंग कामतेकर यांनीही दावा केला आहे. ते म्हणाले, ‘‘शिवसेनेच्या शाखा या जय भवानी ट्रस्टच्या नावावर नोंदविल्या जातात. संबंधित कार्यालय संबंधित ट्रस्टच्या नावावर नाही. मी उपशहरप्रमुख असताना संबंधित कार्यालय सुरू केले. लाईटबिल माझ्या नावावर आहे. २००५ मध्ये झोपडपट्टी सर्वेक्षण झाले. त्या वेळी कार्यालय बंद होते. म्हणून शिवसेना नोंद आहे. हे कार्यालय आम्ही आमच्या खर्चातून बांधले. त्यातील फर्निचर केले. याबाबतचे पुरावे आमच्याकडे आहे. आयकर विवरणामध्ये खर्च केल्याची नोंद आहे.’’
>नगरसेविकेने असंसदीय शब्द वापरले आहेत. महिलांना लाजवेल अशी शिवीगाळ केली आहे. मी दलित आहे. त्यामुळे कायदेशीर कारवाई करणार आहे. आम्ही कायदेशीरपणे कारवाई करणार आहे. शिवसेना कार्यालयाबाबत आजी माजी सदस्यांनी आपण कायदेशीर आहोत, असा दावा केला आहे. त्यामुळे पोलीस तपासात सत्य पुढे येईल.
- जितेंद्र ननावरे, शिवसेना पदाधिकारी
आमच्या ताब्यातील वास्तूचे १९ जुलैला टाळे तोडले. तेथील साहित्य गायब झाले. मालमत्ता ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. टाळे तोडल्याची कबुली संबंधितांनी दिली आहे. याबाबत एमआयडीसी पोलिसांत तक्रार केली आहे. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन वास्तुच्या चाव्या ताब्यात घेतल्या आहेत. याबाबत अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार आहे. न्यायालयात जाणार आहे. - सारंग कामतेकर, सरचिटणीस भाजपा