सुसाईड नोट लिहिणारी शिवानी उत्तीर्ण
By Admin | Published: May 31, 2017 02:27 AM2017-05-31T02:27:29+5:302017-05-31T02:27:29+5:30
बारावीचा निकाल जाहीर होणार असे व्हॉट्सअॅपवर वारंवार येत होते. बारावीच्या निकालाची तारीख एसएससी बोर्डाकडून निश्चित झाली
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : बारावीचा निकाल जाहीर होणार असे व्हॉट्सअॅपवर वारंवार येत होते. बारावीच्या निकालाची तारीख एसएससी बोर्डाकडून निश्चित झाली नव्हती, बारावीचा निकाल आज जाहीर होणार असे २३ मे रोजी व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाले. परीक्षेचे पेपर अवघड गेले असल्याने उत्तीर्ण होण्याची साशंकता मनात होती. नापास झाल्यास घरचे रागवतील, या भीतीने शिवानीने आत्महत्या करणार असल्याची चिठ्ठी ठेवून घर सोडले. शिवानी घरातून निघून गेल्याने चिंताग्रस्त झालेल्या तिच्या पालकांनी पोलिसांकडे ती बेपत्ता झाल्याची फिर्याद नोंदवली. जिवाचे काही बरे वाईट करेल, या भीतीने घरातील सर्व जण काळजीत असताना, शिवानी दुसऱ्या दिवशी घरी सुखरूप परतली. सर्वांना सुखद धक्का बसला, एवढेच नव्हे तर ५६ टक्के गुण मिळवून ती उत्तीर्ण झाली असल्याने त्यांचा आनंद द्विगुणीत झाला.‘‘परीक्षेचे पेपर मला अवघड गेले आहेत, मला माहिती आहे की, परीक्षेत नापास होणार आहे, त्यामुळे मी आत्महत्या करत आहे,’’ अशी
सुसाईड नोट लिहून शिवानी रवींद्र राजपूत (वय १९, रा. संगमगर, जुनी सांगवी) ही तरुणी २३ मे रोजी घरातून कोणालाही काहीही न सांगता बेपत्ता झाली होती.
परीक्षेच्या निकालच्या धास्तीने शिवानी घरातून निघून गेली़ ती केतकावळे येथील बालाजी मंदिरात गेली. तेथेच तिने रात्र काढली. नैराश्येपोटी, परीक्षेचा निकाल काय लागणार या भीतीने तिने आत्महत्येचे पाऊल उचलले. मात्र, तिचे मनपरिवर्तन झाले. तिने स्वत:ला सावरले. दुसऱ्या दिवशी सकाळी ती घरी परतली. शिवानी सुखरूप घरी आल्याचा सुखद धक्का सर्वांना बसला. शिवाय मंगळवारी बारावीचा निकाल जाहीर झाला. त्यात शिवानीने चक्क ५६ टक्के गुण मिळविले असल्याने राजपूत कुटुंबीयांचा आनंद द्विगुणीत झाला.