शिवसह्याद्रीने केला भैरवगड सर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 01:02 AM2018-11-14T01:02:05+5:302018-11-14T01:02:51+5:30
संस्थेच्या सभासदांनी जुन्नर, गणेशखिंडमार्गे माळशेज घाटात पोहोचून आवळे गावातून गड चढण्यास सुरुवात केली. सभासदांच्या ११ जणांच्या गटामध्ये दोन लहान
पिंपरी : भोसरी येथील शिवसह्याद्री अॅडव्हेंचर्सच्या सभासदांनी नुकताच भैरवगड सर करण्याची कामगिरी केली आहे. माळशेज घाट व नाणे घाटाच्या कुशीत पाचशे फूट उंचीचा भैरवगड हा विशाल गड आहे. दहा वर्षांनंतर संस्थेच्या सुभाष नाकते, नागेश पडवळ, आनंद बिराजदार, किरण कदम, मुकेश राठोड, वैभव बांगर, दीपक खेडकर, कालिदास बवले, भरत भसे, सोमनाथ कोळी, जयतु नाकते, वरुण पालांडे यांनी ही कामगिरी केली.
संस्थेच्या सभासदांनी जुन्नर, गणेशखिंडमार्गे माळशेज घाटात पोहोचून आवळे गावातून गड चढण्यास सुरुवात केली. सभासदांच्या ११ जणांच्या गटामध्ये दोन लहान मुलांचाही समावेश होता. भैरवगडाच्या पायथ्याजवळ भिंतीतच पाण्याचे टाके आहे. यामध्ये बारा महिने पाणी असते. तेथे जेवण करून विश्रांती घेण्यात आली. तेथे बेसकॅम्प लावून मुक्काम करण्यात आला. दुसऱ्या दिवशी सकाळी सहाला एका तासात १२५ फुटांवर असलेले पहिले स्टेशन सर करण्यात आले. त्यानंतर एकमेकांना मदत करत सायंकाळी पाचला पाचवे स्टेशन सर करण्यात आले. भैरवगडाच्या माथ्यावरून जय भवानी, जय शिवाजी व भैरवनाथाच्या नावाने चांगभले या घोषणा देण्यात आल्या.
दहा वर्षांनंतर शिवसह्याद्री अॅडव्हेंचर्सच्या सभासदांनी हा गड सर केला. गडावर जाऊन निसर्गाचा मनसोक्त आनंद सभासदांनी घेतला. गड सर करण्यासाठी सर्व सुरक्षेची साधने वापरण्यात आली होती. तसेच सभासदांनी इतिहासकालीन युद्धांच्या व पराक्रमाच्या गोष्टीविषयी चर्चा केली. त्यामुळे सदस्यांमध्ये इतिहासासंबंधी आवड निर्माण झाली.