"...अन् प्रतिदिन राजसिंहासनावर शोभून दिसे छत्रपती शिवराय"
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2023 07:10 PM2023-06-06T19:10:38+5:302023-06-06T19:12:19+5:30
गेल्या ३५० वर्षांच्या इतिहासात शिवराज्याभिषेक सोहळ्याविषयी देश व परदेशातील इतिहासकारांनी व संशोधकांनी अमूल्य लेखन केले आहे...
- हणमंत पाटील
पिंपरी : “पूर्वेकडील पर्वतांपासून ते पश्चिमेकडील समुद्रापर्यंत, तसेच दक्षिणेकडील रामेश्वराच्या सेतूपासून ते हिमालयापर्यंत असलेल्या अनेक राजांना छत्रपती शिवरायांनी जिंकून घेतले. जिंकलेल्या भूभागाचा शेतसारा म्हणून सर्व राजांना आपल्यासाठी कर देण्यास भाग पाडले. विद्वतजनांनी घालून दिलेल्या श्रोतधर्माचा अवलंब करून छत्रपतींनी रायगडावर स्वतःचा राज्याभिषेक करविला. 'छत्र-चामरे आदी राज चिन्हांसह ते प्रतिदिन राज सिंहासनावर शोभून दिसू लागले', असे राज्याभिषेक सोहळ्याचे वर्णन त्यावेळी युवराज म्हणून उपस्थित असलेल्या दस्तुरखुद्द छत्रपती संभाजी महाराज यांनी त्यांच्या ‘बुधभूषण’ या ग्रंथात केले आहे.
गेल्या ३५० वर्षांच्या इतिहासात शिवराज्याभिषेक सोहळ्याविषयी देश व परदेशातील इतिहासकारांनी व संशोधकांनी अमूल्य लेखन केले आहे. आजही तरुण इतिहास अभ्यासकांकडून त्यावर संशोधन व लेखन होत आहे. अशाच नव्या पिढीतील पुण्यातील सह्याद्री प्रतिष्ठानचे अनिल पवार यांनी वर्षभर सर्व विचारधारेच्या इतिहास संशोधकांनी शिवराज्याभिषेक सोहळ्याविषयी लिहिलेल्या ग्रंथाचा धांडोळा घेतला. इतिहास व संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांच्या मुख्य संपादकत्वाखाली 'शिव राज्याभिषेक : मध्ययुगीन भारताच्या इतिहासातील सर्वोच्च घटना' हा सुमारे ५५० पानांचा ग्रंथ साकारला जात आहे. इतिहास अभ्यासक डॉ. गणेश राऊत व चेतन कोळी यांनी संपादन साहाय्य केले आहे. या ग्रंथाचे लवकरच पुण्यात प्रकाशन होणार आहे.
समकालीन व सद्य:कालीन लेखकांची गुंफून...
वि. का. राजवाडे, कृष्णराव केळुसकर, गो. स. सरदेसाई, जदुनाथ सरकार, वा. सी. बेंद्रे, य. न. केळकर, सेतु माधवराव पगडी, ग. ह. खरे अशा थोर इतिहासकारांनी शिवराज्याभिषेकाविषयी विविधांगी केलेली मांडणी व विखुरलेले लेखन एका सूत्रात गुंफले आहे. शिवाय सद्य:कालीन डॉ. आ. ह. साळुंखे, डॉ. जयसिंगराव पवार, श्री. ग. भा. मेहेंदळे, डॉ. रमेश जाधव, डॉ. प्रकाश पवार आदी तज्ज्ञ लेखकांचे लेख या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक या घटनेकडे मराठ्यांच्या उज्ज्वल इतिहासाचे प्रातिनिधीक प्रतीक म्हणून पाहता येते. या घटनेवर अनेक मान्यवर इतिहासकारांनी वेगवेगळ्या दृष्टिकोनातून भाष्य केले. ही भाष्ये कधी एकमेकांना पूरक, तर कधी छेद देणारी ठरतात. महाराष्ट्राच्या भविष्यकालीन वाटचालीसाठी त्यांचा सूक्ष्म अभ्यासाची मुहूर्तमेढ म्हणजे हा समग्र ग्रंथ म्हणण्यास हरकत नसावी.
-डॉ. सदानंद मोरे, ‘शिवराज्याभिषेक’ ग्रंथाचे मुख्य संपादक.