शिवसेना-काँग्रेसमध्ये जुंपली
By admin | Published: December 25, 2015 01:45 AM2015-12-25T01:45:27+5:302015-12-25T01:45:27+5:30
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचा पीएमआरडीएत समावेश करू नये, या मागणीसाठी शिवसेनेने आंदोलन छेडले आहे. त्यावरून काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये जुंपली आहे
पिंपरी : पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचा पीएमआरडीएत समावेश करू नये, या मागणीसाठी शिवसेनेने आंदोलन छेडले आहे. त्यावरून काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये जुंपली आहे. नागरिकांची दिशाभूल करण्यासाठी आंदोलन केले गेले. आंदोलन करण्यापेक्षा सत्तेच्या जोरावर
कामे करा. हा मोर्चा महापालिकेची निवडणूक डोळ्यांसमोर
ठेवून काढल्याची टीका काँग्रेसने केली आहे. तर ‘आपण सत्तेत असताना पंधरा वर्षे काय केले? आपल्या काळात प्रश्न का सुटले नाहीत, याचे आत्मपरीक्षण करा, असे प्रत्त्युतर शिवसेनेने दिले आहे.
पीएमआरडीएत प्राधिकरणाचा समावेश करणार असल्याचे सूतावोच भाजपाच्या नेत्यांनी केले. त्यामुळे स्मार्ट सिटीनंतर आता पीएमआरडीएत समावेशाचा नवीन मुद्दा चर्चेला मिळाला आहे. या निर्णयाविरोधात पहिल्या दिवसापासून शिवसेनेने भूमिका घेतली आहे. मागील आठवड्यात जनमत चाचणी आणि आंदोलन करण्याचे जाहीर केले होते. त्याचबरोबर मनसेनेही स्वाक्षरी मोहीम राबविण्याचे जाहीर केले होते. जनमत चाचणी घेऊन शिवसेनेने मंगळवारी आकुर्डीतील प्राधिकरणाच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता. शिवसेनेने केलेल्या विविध मागण्यांवर काँग्रेसच्या वतीने हल्ला चढविला आहे. विरोधी पक्षनेते विनोद नढे, नगरसेवक राहुल भोसले आणि शिवसेनेचे शहरप्रमुख राहुल कलाटे यांच्या जुंपली आहे.
नढे यांनी याविषयीचे पत्र प्रसिद्धीस दिले आहे. ‘नागरिकांचा विश्वास गमावून बसलेल्या शिवसेनेने नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. निर्णयक्षमता आणि सत्तादरबारी बळ नसलेल्या या पक्षाला आपला दुबळेपणा लपविण्यासाठी नेहमीच मोर्चाचा आधार घ्यावा लागला आहे. स्मार्ट सिटीत नाकारले गेले. अनधिकृत बांधकामे नियमितीकरणाचा विसर पडला आहे. एचए, एसआरएसारखे प्रकल्प रखडले आहेत. अनधिकृत बांधकामांचा प्रश्न न्यायालयीन पातळीवर असताना देखील नागरिकांच्या भावना भडकावून राजकीय भांडवल केले जात आहे. हेच पीएमआरडीएच्या बाबतीत घडत आहे. कुंटे समितीचा अहवालही दडवून ठेवला आहे. शिवसेनेला याबाबत खरेच विरोध करायचा असेल, तर हा विषय मंत्रिमंडळासमोर आलाच नसता. शिवसेनेच्या एकाही मंत्र्याने विरोध केला नाही. महापालिकेची आगामी निवडणूक डोळ्यांसमोर ठेवूनच हा विरोध केला जात आहे.
राहुल भोसले म्हणाले, ‘‘शिवसेना-भाजपा सरकारने अनधिकृत बांधकामांबद्दल निर्णय घेतला, तर शहरातील बहुतांश अनधिकृत घरे नियमित होणार आहेत. शिवसेनेने कडक भूमिका घेतल्यास प्राधिकरणाचे विलीनीकरणही थांबू शकते. हे सरकार सामान्यांचे नसून, धनदांडग्यांचे आहे.’’
कलाटे म्हणाले, ‘‘शिवसेनेच्या वतीने जनमत चाचणी घेण्यात आली. त्यात नागरिकांनी विलीनीकरणास विरोध दर्शविला आहे. या संदर्भातील अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केला जाणार आहे. आम्ही सत्तेत असतानाही जनहितासाठी जनतेबरोबरच आहोत. त्यामुळे काँग्रेसच्या टीकेला काहीही अर्थ नाही.’’ (प्रतिनिधी)
कलाटे म्हणाले, ‘‘पंधरा वर्षे सत्ता असताना कोणत्याही प्रकारचे निर्णय घेतले नाहीत. आता हेच लोक टीका करताहेत, ही गोष्ट जनता विसरू शकणार नाही. पंधरा वर्षे अनधिकृत बांधकामे नियमित करणे तर सोडाच, साधी प्राधिकरण समितीही नियुक्त करता आली नाही, यापेक्षा दुसरे दुर्दैव काय असणार? आमची बांधिलकी जनतेबरोबर आहे, सरकारबरोबर नाही. योग्य त्या वेळी आमच्या आमदारांनी याबाबत विधिमंडळात आवाज उठविला आहे. आमदार गौतम चाबुकस्वार यांनी औचित्याचा मुद्दाही उपस्थित केला होता. मात्र, त्यांना संधी मिळाली नाही. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पत्र दिले आहे.’’
महापालिकेतील विरोधी पक्षनेते म्हणून शून्य काम असलेल्या, प्रभावहीन विनोद नढे यांची शिवसेनेवरील टीका हा मोठा विनोद आहे. दिवा विझताना फडफडतो, त्याप्रमाणे विरोधी पक्षनेतेपदावरून पायउतार होताना त्यांनी शिवसेनेवर केलेली टीका ही त्यांची अस्तित्वाची लढाई असावी. विरोधी पक्षनेते पदाच्या खुर्चीवर चिकटलेल्या नढेंचा बोलविता धनी कोण आहे, हे सर्वांना माहीत आहे.
- नंदकुमार सातुर्डेकर, शहर संघटक