शिवसेना-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 12:00 AM2019-02-25T00:00:46+5:302019-02-25T00:01:00+5:30
परस्परविरोधी गुन्हे : वळसे पाटील यांच्या घरासमोर शिवसेना शाखेचे आढळराव यांच्या हस्ते उद्घाटन
मंचर : निरगुडसर (ता. आंबेगाव) येथे शिवसेना शाखेचे उद्घाटन झाल्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री उडाली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मागासवर्गीय तरुणांवर हल्ला केल्याने त्यांच्यावर अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केली, तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली.
मंचर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज देण्यात आले असून, रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. अनुचित प्रकार घडू नये यासाठी निरगुडसर गावात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या निरगुडसर गावात त्यांच्या निवासस्थानासमोरच शिवसेना शाखेचे आज उद्घाटन होणार होते. रात्रीतून त्यासाठी तयारी करण्यात आली. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उपस्थितीत उद्घाटन होऊन काही कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्याच वेळी जमाव जमू लागला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या.
खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि त्यांचे समर्थक शिरुर येथे नियोजित कार्यक्रमासाठी मार्गस्थ झाले. त्यानंतर उपस्थित असलेल्या वळसे पाटील समर्थक आणि आढळराव पाटील समर्थकांनी नेत्यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या. त्यांनतर समोरासमोर कार्यकर्ते भिडले. त्यामुळे एकमेकांत हाणामारी झाली. तीन तरुणांना मारहाण करण्यात आली. यामुळे वातावरण एकदम तणावग्रस्त झाले. या घटनेत काही मागासवर्गीय कार्यकर्त्यांनाही मारहाण झाल्याचे पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी अर्जात म्हटले आहे. निरगुडसर गावात झालेल्या दोन पक्षीय कार्यकर्त्यांमधील भांडणामुळे वातावरण नियंत्रणाखाली असून, पोलीस उपनिरीक्षक अर्जुन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
निरगुडसर गावातील शांतता बिघडविण्याचा प्रयत्न शिवसेनेने केला आहे. त्यांनी बाहेरगावाहून भाडोत्री गुंड आणून फूस लावून येथील दलित बांधवांमध्ये भांडण लावून, मारामारी करून देण्याचा अत्यंत खालच्या पातळीवरचा प्रकार घडवून आणला आहे. निरगुडसर ग्रामस्थांच्या वतीने त्याचा निषेध करतो. दोषींवर पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी.
- दादाभाऊ टाव्हरे, उपसरपंच, निरगुडसर
राष्ट्रवादीची दादागिरी निरगुडसर गावात सुरु असून प्लॅन करुन मागासवर्गीय तरुणांना जाणीवपूर्वक मारहाण करण्यात आली आहे. शूटिंगमध्ये सर्वकाही दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गुंडगिरी करून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्याचा केलेला प्रयत्न निंंदणीय आहे. गरिबांवर अन्याय झाला असून, दोषींवर पोलिसांनी कारवाई करावी. अन्यथा आम्ही पोलीस ठाण्यातून हलणार नाही. ठिय्या आंदोलन करू- रवींद्र वळसे-पाटील, माजी उपसरपंच