लोणावळ्यात ६ हजार दुचाकींसह शोभायात्रा
By admin | Published: April 9, 2016 01:38 AM2016-04-09T01:38:15+5:302016-04-09T01:38:15+5:30
गुढीपाडवा व हिंदू नववर्षाच्या स्वागतानिमित्त हिंदू समिती लोणावळा शहर व ग्रामीण परिसराच्या वतीने शुक्रवारी आयोजित शोभायात्रेत सुमारे सहा हजार दुचाकीवरून तब्बल १२ हजार जण
लोणावळा : गुढीपाडवा व हिंदू नववर्षाच्या स्वागतानिमित्त हिंदू समिती लोणावळा शहर व ग्रामीण परिसराच्या वतीने शुक्रवारी आयोजित शोभायात्रेत सुमारे सहा हजार दुचाकीवरून तब्बल १२ हजार जण सहभागी झाले होते. पुरंदरे ग्राऊंड लोणावळा ते
खंडाळा, तुंगार्ली, वलवण, वरसोली, वाकसई चाळ, कार्ला फाटा दरम्यान तब्बल तीन तास अतिशय शिस्तबद्धपणे ही शोभायात्रा सुरू होती. महिला व युवकांचा नेहमीप्रमाणे या वर्षी उत्साह वाखणण्याजोगा होता.
कार्ला गावातील ऐतिहासिक तलावाजवळ शोभायात्रेची सांगता झाली. या वेळी महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी उपस्थितांना हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा देत मार्गदर्शन केले. बाबासाहेब म्हणाले, ‘‘चैत्री पाडव्याच्या दिवशी प्रभू रामचंद्र लंकेवर विजय मिळवून अयोद्धेत दाखल झाले. तेव्हापासून तमाम हिंदू बांधव हा दिवस घरावर गुढी उभारून विजयदिन म्हणून साजरा करतात.
गुढीपाडव्याच्या दिवशी संवत्सर बदलते व हिंदू नववर्षाची सुरुवात होते. या दिवशी हिंदू बांधवांनी एकत्र येत धर्म बलशाली करत हिंदू संस्कृतीचे दर्शन घडवावे.
समिती शहर व ग्रामीण भागातील हिंदू बांधवांच्या वतीने समितीच्या वतीने तीन वर्षांपासून गुढीपाडवा व नववर्षाचे स्वागत भव्य शोभायात्रा काढून केले जाते. शिस्तबद्ध व नियोजनबद्धपणे ही शोभायात्रा पार पडली. (वार्ताहर)