चिखलीतील धक्कादायक घटना! पाच जणांनी मिळून केले एकावर तलवारीने वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2021 02:32 PM2021-07-13T14:32:54+5:302021-07-13T14:37:18+5:30
पाच जणांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल, भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडलेल्याचा राग मनात धरून केला हा प्रकार
पिंपरी: भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या रागातून पाच जणांनी मिळून एकावर कोयते आणि तलवारीने वार केले. फावड्याच्या लाकडी दांडक्याने मारहाण करून खून करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी दुपारी पाटीलनगर, चिखली येथे ही घटमना घडली.
सचिन नितीन गायकवाड, सुरज खपाले, ऋतिक उर्फ मुंग्या रोकडे, विशाल शिंदे, भीमा अशोक कांबळे (सर्व रा. चिखली गाव) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत मारुती बाजीराव मोरे (वय ४२ , रा. पाटीलनगर, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विकास विष्णू मोरे असे जखमीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन गायकवाड आणि मारुती मोरे यांचे नातेवाईक गणेश मोरे व अमोल मोरे यांचे भांडण झाले. त्यावेळी मारुती मोरे यांचा पुतण्या विकास मोरे हा भांडणे सोडवण्यासाठी मध्ये पडला होता. त्याचा राग आरोपींच्या मनात होता. विकास मोरे सोमवारी दुपारी साडे पाच वाजताच्या सुमारास त्यांच्या घराजवळ असलेल्या बाकड्यावर बसला होता. त्यावेळी आरोपी तिथे आले.
सुरज खपाले याने माझ्या गँग मधील मेंबरला नडतो का, असे म्हटले. त्यानंतर बेकायदेशीरपणे जमाव जमवून तलवारी, कोयते दाखवून दहशत माजवली. तसेच विकास मोरे याच्यावर तलवार आणि कोयत्याने वार केले. त्यानंतर फावड्याच्या लाकडी दांडक्याने मारहाण करून ठार मारण्याचा प्रयत्न केला.