पिंपरीतील धक्कादायक घटना! सासूचा खून केला, मृतदेह पुणे - मुंबई महामार्गाच्या कडेला फेकून दिला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 02:19 PM2021-08-25T14:19:49+5:302021-08-25T14:20:16+5:30
मावशी आणि सराईत गुन्हेगार यांच्यावर गुन्हा दाखल
पिंपरी : सासू खूप त्रास देते म्हणून मावशीने सराईत गुन्हेगाराच्या मदतीने सासूचा खून केल्याची घटना घडली आहे. त्यानंतर दोघांनी मिळून मृतदेह जुन्या पुणे - मुंबई महामार्गाच्या कडेला फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सराईत गुन्हेगारासह त्याच्या मावशीवर गुन्हा दाखल केला. तसेच सराईत गुन्हेगाराला पोलिसांनीअटक केली.
इम्तियाज उर्फ चिंट्या मुस्ताक शेख (रा. ओटास्किम, निगडी), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह त्याची मावशी मुन्नी गेना जोगदंड हिच्या विरोधात देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सोजराबाई दासा जोगदंड (वय ७०, रा. येरवडा), असे खून झालेल्या वयोवृद्ध महिलेचे नाव आहे. सोजराबाई बेपत्ता असल्याबाबत त्यांची मुलगी लतिका वसंत गायकवाड यांनी येरवडा पोलीस ठाण्यात नोंद केली होती.
दरम्यान, पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांकडून ओटास्किम परिसरात रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी सुरू होती. इम्तियाज शेख हा संशयितरित्या फिरत असल्याची माहिती पोलीस नाईक जमीर तांबोळी यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी इम्तियाज याला ताब्यात घेतले. इम्तियाज याने त्याची मावशी मुन्नी हिच्यासोबत मिळून आरोपी मुन्नी हिची सासू सोजराबाई हिचा खून केल्याची कबुली इम्तियाज याने दिली.
जुन्या पुणे-मुंबई महामार्गालगत झाडाझुडपांच्या आडोशाला मृतदेह दिला टाकून
मुन्नी हिला तिची सासू सोजराबाई ही वारंवार विनाकारण भांडणतंटा करून त्रास देत होती. नेहमी घरातून बाहेर काढत होती. त्यामुळे मुन्नी हिने १४ ऑगस्टला फोन केला. तू आताच्या आता ते, सासू खूप त्रास देते, असे रडत मुन्नी हिने इम्तियाज याला सांगितले. त्यानंतर इम्तियाज याने एका पार्किंगमधील रिक्षाचे स्वीच तोडून रिक्षा घेऊन येरवडा येथे गेला. तेथे त्याची मावशी मुन्नी आणि त्याने बेत आखला. त्यानुसार मुन्नी हिने तिची सासू सोजराबाई हिचे पाठीमागून हात धरून ठेवले. तर इम्तियाज याने दोन्ही हाताने गळा आवळून सोजराबाई हिला जीवे ठार मारले. त्यानंतर मृतदेह साडी व चादरीमध्ये बांधला. रिक्षाने जाऊन देहूरोड हद्दीत जुन्या पुणे-मुंबई महामार्गालगत झाडाझुडपांच्या आडोशाला मृतदेह टाकून दिला.
शेताची विक्री केल्याने सोजराबाईकडे पैसे आले होते. तसेच ती मुन्नीला त्रास देत होती. त्यामुळे तिचा खून केला, असे आरोपी इम्तियाज याने पोलिसांना सांगितले. सोजराबाईचा मृतदेह टाकलेल्या ठिकाणी आरोपी इम्तियाज याला पोलिसांनी नेले. तेथे सोजराबाईचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मिळून आला. पोलिसांनी आरोपी इम्तियाज याला अटक केली. त्याची मावशी असलेली आरोपी मुन्नी फरार असून, पोलीस तिचा शोध घेत आहेत. पुढील तपासासाठी हा गुन्हा येरवडा पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार आहे.
पॅरोलवर सुटून केला खून
खूनप्रकरणी आरोपी इम्तियाज याच्यावर दोन गुन्हे दाखल आहेत. त्यातील एक गुन्हा निगडी पोलीस ठाण्यात दाखल असून या गुन्ह्यात तो जामिनावर आहे. तसेच खूनप्रकरणी दुसरा गुन्हा खडकी पोलीस ठाण्यात दाखल असून या प्रकरणी आरोपी इम्तियाज हा सध्या पॅरोलवर एकवर्षापूर्वी सुटला आहे. असे असतानाच त्याने पुन्हा खून केल्याचे उघडकीस आले असून, पोलिसांनी त्याला अटक केले. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली.