धक्कादायक !! एकतर्फी प्रेमातून संगणक अभियंता तरुणीला गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2018 03:05 PM2018-11-11T15:05:38+5:302018-11-11T15:11:33+5:30
हिंजवडीतील आयटी कंपनीत काम करणाऱ्या तरुणीने प्रेम संबंधास नकार दिला या कारणावरून तिला पिस्तुलातून गोळ्या घालण्याची धमकी दिली.
पिंपरी : हिंजवडीतील आयटी कंपनीत काम करणाऱ्या तरुणीने प्रेम संबंधास नकार दिला या कारणावरून तिला पिस्तुलातून गोळ्या घालण्याची धमकी दिली. या प्रकरणी संगणक अभियंता तरुणावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.
जितेंद्र सोळंकी(रा.वाकड ) असे गुन्हा दाखल झालेल्या संगणक अभियंत्याचे नाव आहे. याबाबत 24 वर्षीय तरुणीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 5 ते 10 नोव्हेंबर 2018 या कालावधीमध्ये घडली. फिर्यादी तरुणी व आरोपी जितेंद्र हे दोघे पूर्वी हिंजवडीतील कॉग्निझंट कंपनीत काम करीत होते. त्यांची एकमेकांशी ओळख होती. आरोपी जितेंद्र याने तरुणीची जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. मात्र तरूणीने त्यास नकार दिला. त्यामुळे आरोपीने गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच पाठलाग करीत तिच्या मोबाइलवर संपर्क साधला. सातत्याने पाठपुरावा केल्याने या प्रकाराला कंटाळून तरुणीने पोलिसांकडे तक्रार केली.