धक्कादायक ! प्रेयसीच्या बाजूला बसल्याच्या रागात मित्रानेच केली मित्राची हत्या, पिंपरीतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2017 02:31 PM2017-09-12T14:31:29+5:302017-09-12T14:31:29+5:30
प्रेयसीच्या बाजूला जाऊन बसल्याच्या रागात मित्रानेच मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. आदित्य सुनील जैद असं मयत मुलाचं नाव आहे.
चिंचवड, दि. 12 - प्रेयसीच्या बाजूला जाऊन बसल्याच्या रागात मित्रानेच मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. आदित्य सुनील जैद असं मयत मुलाचं नाव आहे. आरोपी तरुणाने मारहाण आदित्य सुनील जैदला करण्यासाठी आपल्या काही मित्रांना बोलावलं होतं. या सर्वांनी मिळून आदित्य सुनील जैदला बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्याचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे मृत पावलेला आदित्य सुनील जैद एका महिला पोलीस कर्मचा-याचा मुलगा असल्याची माहिती मिळाली आहे. एवढ्याशा क्षुल्लक कारणावरुन तरुणाला मारहाण करत हत्या केल्याने शहरात खळबळ माजली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य सुनील जैद हा आरोपीच्या मैत्रीणीसोबत बसला होता. आपल्या मैत्रीणीच्या बाजूला आदित्य बसला आहे याचा आरोपी तरुणाला प्रचंड राग आला होता. या रागातून त्याने आपल्या काही मित्रांना मारहाण करण्यासाठी बोलावलं होतं. आरोपी तरुणाने आपल्या मित्रांसोबत आदित्यला महाविद्यालयाजवळून जीपमध्ये बसवून एका ठिकाणी नेलं. त्यानंतर त्याला बॅटने बेदम मारहाण करण्यात आली.
आरोपी तरुणांनी केलेल्या बेदम मारहाणीत आदित्य गंभीर जखमी झाला होता. यानंतर त्याला भोसरी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र बेदम मारहाणीमुळे आदित्य सुनील जैदचा रुग्णालयात पोहोचण्यापुर्वीच मृत्यू झाला होता. आदित्य सुनील जैदचा मृत्यू झाल्याने आपण अडचणीत सापडणार असल्याचं लक्षात येताच तरुणांनी रुग्णालयामधून पळ काढला. यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं. पोलीस सध्या याप्रकरणी तपास करत आहेत.