धक्कादायक! चारित्र्यावर संशय घेत पत्नीचा खून; कोयत्याने केले वार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 10:32 AM2021-08-18T10:32:21+5:302021-08-18T10:32:29+5:30
पुनावळे येथील घटना : आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात
पिंपरी : चारित्र्यावर संशय घेत भांडणात पतीने लोखंडी कोयत्याने वार करून पत्नीचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुनावळे येथे मंगळवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास ही घटना घडली.
गौरी राहुल प्रतापे (वय २१, रा. विजयनगर, माळवाडी, पुनावळे), असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी महिलेचा पती राहुल गोकुळ प्रतापे (वय ३०, रा. विजयनगर, माळवाडी, पुनावळे), याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. नवनाथ रामदास बोरगे (वय ३२, रा. विजयनगर, पुनावळे) यांनी या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात बुधवारी (दि. १८) फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल हा सिक्युरिटी गार्ड आहे. तो त्याची पत्नी गौरीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. तसेच तिच्याशी भांडण करीत होता. त्यातून चिडून राहुलने मंगळवारी रात्री लोखंडी कोयत्याने गौरीवर वार केले. यात गंभीर जखमी झाल्याने तिचा मृत्यू झाला. रिक्षा चालक नवनाथ बोरगे यांनी फिर्याद दिल्यानुसार याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच पोलिसांनी राहुल प्रतापे याला ताब्यात घेतले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.