धक्कादायक! शेतात आढळले सात दिवसांचे स्त्री अर्भक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2020 05:14 PM2020-01-17T17:14:19+5:302020-01-17T17:16:46+5:30
फांद्या आणि काटेकुटे बाजूला करून पांढरे कापड बाहेर काढले असता सात ते आठ दिवसांचे स्त्री जातीचे अर्भक आढळून आले....
पिंपरी : स्त्री जातीचे सात दिवसांचे मृत अर्भक शेतात पुरलेल्या अवस्थेत आढळले. हिंजवडी जवळ माण येथे राक्षे वस्तीत हा धक्कादायक प्रकार गुरुवारी (दि. १६) सकाळी आठच्या सुमारास उघडकीस आला आहे.
मोहन आनंदा राक्षे (वय ३५, रा. राक्षे वस्ती, माण, ता. मुळशी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात पालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राक्षे यांची माण गावाच्या राक्षे वस्ती येथे मुळा नदी काठी शेती आहे. गुरुवारी (दि. १६) सकाळी आठच्या सुमारास शेतीला पाणी देण्यासाठी फिर्यादी राक्षे शेतावर गेले. नदीकाठी पाण्याचा पंप सुरु करण्यासाठी जात असताना त्यांना त्यांच्या शेतात जमीन खोदलेली आढळून आले. तसेच तेथे झाडाच्या फांद्या आणि काटेकुटे टाकल्याचे त्यांना दिसून आले. राक्षे यांनी पाहणी केली असता तेथे पांढऱ्या कापडात काहीतरी पुरले असल्याचे त्यांना आढळून आले. फांद्या आणि काटेकुटे बाजूला करून पांढरे कापड बाहेर काढले असता त्यामध्ये सात ते आठ दिवसांचे स्त्री जातीचे अर्भक आढळून आले. त्यानंतर राक्षे यांनी याबाबत हिंजवडी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी अर्भकाला ताब्यात घेतले. उत्तरीय तपासणीसाठी सांगवी येथील जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात अर्भक देण्यात आले आहे. हिंजवडी पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक कविता रुपनर तपास करीत आहेत.