तीनशे कोटींच्या बिटकॉइनसाठी पोलिसानेच केले अपहरण; पिंपरीतील धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2022 10:42 AM2022-02-02T10:42:10+5:302022-02-02T17:58:40+5:30

वाकड पोलिसांनी अपहरणाचा मास्टरमाइंड असलेल्या पोलिसाला सापळा लावून बेड्या ठोकल्या

Shocking type in Pimpri Police find culprit in kidnapping case | तीनशे कोटींच्या बिटकॉइनसाठी पोलिसानेच केले अपहरण; पिंपरीतील धक्कादायक प्रकार

तीनशे कोटींच्या बिटकॉइनसाठी पोलिसानेच केले अपहरण; पिंपरीतील धक्कादायक प्रकार

googlenewsNext

पिंपरी : अपहरणप्रकरणी पोलीसचं गुन्हेगार असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एका व्यक्तीकडे मोठ्या प्रमाणात क्रिप्टो करन्सी असल्याची माहीती होती.  त्याचे अपहरण केले तर मोठ्या प्रमाणात क्रिप्टो करन्सी व पैसे मिळू शकतात, त्यामुळे त्याने त्याच्या साथीदारांसोबत मिळून त्याचे अपहरण केले. मात्र वाकड पोलिसांनी अपहरणाचा मास्टरमाइंड असलेल्या पोलिसाला सापळा लावून बेड्या ठोकल्या. याप्रकरणी रफिक अल्लाउद्दीन सय्यद (वय ३८) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

दिलीप तुकाराम खंदारे (रा. भोसरी, पुणे. मुळगाव मु.पो. कोनाटी, ता. सिंदखेड राजा, जि. बुलढाणा) असे अटक केलेल्या मास्तर माईंड आरोपी पोलीस शिपायाचे नाव आहे. त्याच्यासह सुनिल राम शिंदे (रा. खारदांडा पश्चिम, मुंबई), वसंत श्यामराव चव्हाण (रा. नालासोपारा पुर्व, मुंबई), फ्रान्सिस टिमोटी डिसूझा (रा. कल्याण (पश्चिम) जि. ठाणे), मयुर महेंद्र शिर्के (रा. खार पश्चिम, मुंबई), प्रदिप काशिनाथ काटे (रा. दापोडी, पुणे), शिरीष चंद्रकांत खोत (रा. उलवे, नवी मुंबई), संजय ऊर्फ निकी राजेश बंसल (रा. उलवे, नवी मुंबई) यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींनी विनय सुंदरराव नाईक (रा. ताथवडे) यांचे १४ जानेवारी रोजी ताथवडे येथील एका हॉटेलमधून अपहरण केले होते. 

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ जानेवारीला नाईक यांचे सात ते आठ अनोळखी इसमांनी अपहरण केले. याबाबत नाईक यांचे मित्र सय्यद यांनी वाकड पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत दोन पथके तयार केली. पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज गोळा करत तांत्रिक विश्लेषण सुरु केले. दरम्यान पोलीस आपल्या मागावर असल्याची कुणकुण आरोपींना लागली. त्यांनी नाईक यांना वाकड भागात सोडले आणि आरोपी पळून गेले. आरोपींनी बिट कॉइन व आठ लाख रुपयांची मागणी केल्याचे नाईक यांनी पोलिसांना सांगितले. 

सायबरमध्ये असतांना शोधले सावज

पोलीस शिपाई दिलीप तुकाराम खंदारे हा पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय येथील पोलीस मुख्यालयात पोलीस शिपाई पदावर कार्यरत आहे. सध्या तो कर्तव्यावर गैरहजर होता. तो पूर्वी पुणे शहर पोलीस दलात कार्यरत होता. तिथे तो सायबर विभागात काम करत असताना त्याने सेवाअंतर्गत ऑफीस ऑटोमेशन, सायबर गुन्हे प्रणाली, एडव्हान्स सायबर क्राईम इन्व्हेस्टीगेशन टेक्नोलॉजी, बेसीक ऑफ हार्डवेअर अँड नेटवर्क इंन्फॉरमेशन, मोबाईल फॉरेन्सीक असे कोर्स केले आहेत. तो सायबर क्राईम विभाग पुणे शहर येथे नेमणुकीस असताना त्याला विनय सुंदरराव नाईक यांच्याकडे एकूण ३०० कोटी रुपयांची बिट कॉईन ही क्रिप्टो करन्सी असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर त्याने विनय नाईक यांचे अपहरण करून पैसे उकलण्याचा डाव आखला. दिलीप खंदारे हा पिंपरी चिंचवड पोलीस दलात कार्यरत असल्याचे तपासात समोर आले. त्यानुसार पोलिसांनी खंदारे याला तांत्रिक विश्लेषण करून भोसरी येथून सापळा लावून ताब्यात घेतले. खंदारे याने त्याच्या साथीदारांसोबत मिळून हा गुन्हा सुनियोजितपणे कट रचून केल्याचे कबुल केले. पोलीस उपनिरीक्षक गणेश तोरगल तपास करीत आहेत.

Web Title: Shocking type in Pimpri Police find culprit in kidnapping case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.