पिंपरीतील धक्कादायक प्रकार! एटीएममधून चार मिनिटांत साडेसात लाख लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 06:27 PM2021-07-26T18:27:41+5:302021-07-26T18:28:09+5:30
चोरट्यांनी चार मिनिटांत बनावट चावीचा वापर करून एटीएम मशीनमधून सात लाख ५२ हजार ३०० रुपये चोरी केले
पिंपरी : एटीएम मशीन फोडून रोकड चोरून नेण्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत हे प्रकार वाढत आहेत. चोरट्यांनी चार मिनिटांत बनावट चावीचा वापर करून एटीएम मशीनमधून सात लाख ५२ हजार ३०० रुपये चोरी केले. तळेगाव दाभाडे येथे शुक्रवारी रात्री हा प्रकार घडला.
राजू प्रभाकर कांबळे (वय ५०, रा. तळेगाव दाभाडे, ता. मावळ) यांनी याप्रकरणी रविवारी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी तीन अनोळखी आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव दाभाडे येथील अभ्युद्य बँकेच्या बाहेर अभ्युदय बँकेचे एटीएम आहे. आरोपी चोरट्यांनी शुक्रवारी रात्री नऊ वाजून सहा मिनिटांनी अभ्यूदय बँकेच्या एटीएममध्ये प्रवेश केला. बनावट चावीचा वापर करून तसेच पासवर्ड टाकून एटीएमचे मशीन उघडले. त्यानंतर सात लाख ५२ हजार ३०० रुपये चोरी करून नेले. कांबळे हे बँकेचे मॅनेजर आहेत. एटीएममधून रोकड चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी तीन चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.