पिंपरीच्या जम्बो कोव्हीड सेंटरमधील धक्कादायक प्रकार! केली मृतांच्या दागिन्यांची चोरी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2021 11:01 AM2021-05-06T11:01:38+5:302021-05-06T11:02:59+5:30
चोरी करण्याचा गाठला कळस
पिंपरी: कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. बहुसंख्य नागरिकांना उपचारासाठी रुग्णालय आणि कोव्हीड सेंटर मध्ये दाखल होण्याची वेळ येत आहे. पण उपचारदरम्यान काहींना आपला जीव गमवावा लागत आहे. अशा कठीण काळातही चोरटयांनी निर्लज्जपणाचा कळस गाठला आहे. पिंपरीतील जम्बो कोव्हीड सेंटरमध्ये कोरोना उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या रुग्णांच्या दागिन्यांची चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
वैष्णवी ज्योतिबा खुळे (वय २०, रा. पिंपळे निलख) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात बुधवारी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खुळे यांचे मामा प्रशांत विश्वनाथ मोरे (वय ४०, रा. आळंदी) यांना कोरोना विषाणूंचा संसर्ग झाल्याने पिंपरीतील नेहरूनगर येथील जम्बो कोबड सेंटरमध्ये २५ एप्रिलला दाखल केले होते. त्यांचे १ मे रोजी निधन झाले. त्यावेळी प्रशांत मोरे यांच्या सोबत असलेला दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल अज्ञात चोरट्यांनी चोरी करून नेला आहे.
दुसऱ्या प्रकरणात सागर दिवाकर गुजर (वय ३५, रा. बोपखेल) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात बुधवारी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजर यांची आई सितल दिवाकर गुजर (वय ६१, रा. बोपखेल) यांना कोरोना विषाणूंचा संसर्ग झाल्याने पिंपरीतील नेहरूनगर येथील जम्बो कोविड सेंटरमध्ये १४ एप्रिलला दाखल करण्यात आले. सितल गुजर यांचे १९ एप्रिलला निधन झाले. त्यावेळी त्यांच्याकडे असलेले मंगळसूत्र, कर्णफुले, सोन्याची एक व चांदीच्या दोन, अशा तीन अंगठ्या, असा एकूण ४१ हजार रुपये किमतीचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरी करून नेला आहे.