मतदानानंतर वारजे येथे गोळीबार करणारा जाळ्यात; पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सराईतास ठोकल्या बेड्या
By नारायण बडगुजर | Published: May 9, 2024 06:44 PM2024-05-09T18:44:36+5:302024-05-09T18:45:40+5:30
गोळीबार झालेले ठिकाण मतदान केंद्रापासून दूर अंतरावर असल्याने मतदान प्रक्रियेशी या घटनेचा काहीही संबंध नसल्याचे पुणे पोलिसांनी सांगितले.
पिंपरी : मतदान संपल्यानंतर वारजे परिसरात दहशत पसरविण्यासाठी गोळीबार करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पिंपरी येथे अटक केली. त्याच्याकडून पिस्तूल जप्त केले. पिंपरी - चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने बुधवारी (दि. ८) रात्री ही कारवाई केली.
सिद्धप्पा येळसंगेकर (३५, रा. येळसंगी, ता. आळंद जि. गुलबर्गा, कर्नाटक) असे अटक केलेल्याचे नाव आहे. गोळीबार प्रकरणी पोलिस अंमलदार हेमकांत पवार यांनी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
वारजे येथील काही भाग बारामती लोकसभा मतदारसंघात येतो. मंगळवारी (दि. ७) या भागात मतदान झाल्यानंतर रात्री अकराच्या सुमारास वारजे परिसरात तिघेजण दुचाकीवरून आले. त्यांनी हवेत गोळीबार केला. यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. गोळीबार केल्यानंतर तिघेजण कात्रजच्या दिशेने पळून गेले. पुणे पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. मात्र त्यांचा तिसरा साथीदार फरार झाला. गोळीबार झालेले ठिकाण मतदान केंद्रापासून दूर अंतरावर होते. त्यामुळे मतदान प्रक्रियेशी या घटनेचा काहीही संबंध नसल्याचे पुणे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, बुधवारी पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात एकजण पिस्तूल घेऊन आल्याची माहिती पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट दोनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सिद्धप्पा याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पिस्तूल जप्त केले. गोळीबार केल्याचे सिद्धप्पाने पोलिसांना सांगितले. त्याने त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांसोबत मिळून वारजे येथे गोळीबार केला. त्यानंतर सिद्धप्पा हा लपण्यासाठी पिंपरी परिसरात आला. बुधवारी रात्री पिंपरीतील एका ठिकाणी तो लपून दारू पीत होता. त्याचवेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम, उपनिरीक्षक गणेश माने, शिवानंद स्वामी, दिलीप चौधरी, संतोष इंगळे, सागर अवसरे, नामदेव कापसे, आतिष कुडके, देवा राऊत, अजित सानप, शिवाजी मुंढे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
खून प्रकरणी दोन गुन्हे दाखल
सिद्धप्पा याच्यावर खूनप्रकरणी गुलबर्गा जिल्ह्यातील येळसंगी पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. पिस्तूल बाळगल्या प्रकरणी सिद्धप्पा याच्यावर पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.