विक्रेत्याला मारहाण करून दुकान पेटविले
By admin | Published: December 27, 2016 03:20 AM2016-12-27T03:20:17+5:302016-12-27T03:20:17+5:30
चप्पल खरेदीवरून झालेल्या वादंगातून चिडून टोळक्याने रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास पिंपरी, मोरवाडीतील विक्रेत्यावर कोयत्याने वार केले.
पिंपरी : चप्पल खरेदीवरून झालेल्या वादंगातून चिडून टोळक्याने रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास
पिंपरी, मोरवाडीतील विक्रेत्यावर कोयत्याने वार केले. तसेच पेट्रोल टाकून दुकान पेटविले. त्यामध्ये विक्रेत्याचे अंदाजे १६ लाखांचे नुकसान झाले आहे. ही घटना मोरवाडी येथे घडली. या प्रकरणी सहा जणांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इरशाद खान यांचे मुंबई- पुणे महामार्गालगत मोरवाडी येथे चप्पल विक्रेचे दुकान आहे. रविवारी रात्री मुन्ना, मोदक, प्रकाश आणि ऋतीक हे चप्पल घेण्यासाठी खान यांच्या दुकानात आले होते. त्या वेळी त्यांनी ५०० रुपयांची चप्पल खरेदी केली. आरोपींनी १५० रुपये कमी देणार, असे सांगितले. मात्र, कमी किमतीत चप्पल विक्री करणे परवडत नाही, असे विक़्रेत्याने सांगितले. त्या वेळी त्यांच्यात बाचाबाची झाली. त्याचे रूपांतर हाणामारीत झाले.
इरशाद खान या विक़्रेत्याला मारहाण करण्यात आली. या प्रकरणी मुन्ना उर्फ महेश चंदनशिवे (वय २४), मोदक उर्फ दीपक नवरत्ने (वय २०, रा. घरकुल चिखली), प्रकाश मगर (वय १९), ऋतीक पांढरे (वय १८), बालाजी ओगले (वय १८), मुन्ना वाल्मीकी (वय २४), आकाश उर्फ बाँड मोहोळ (वय १९), अतुल निसर्गंध (वय १९) यांच्यासह एका अल्पवयीन आरोपी आणि तीन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खुनाचा प्रयत्न केल्याचे त्यात नमूद केले आहे. प्रकरणी अफजल इसरार खान (वय २५) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आरोपी मुन्ना याने खान यांच्या डोक्यात कोयत्याने वार केले. त्यानंतर आरोपींनी परिसरात दहशत माजविली. त्यामुळे नागरिकांनी दुकाने बंद केली. रात्री पावणेबाराच्या सुमारास
आरोपीने साथीदारांना बोलावून घेतले. रॉकेल आणि पेट्रोल ओतून दुकान पेटवले. त्यामध्ये खान
यांच्या दुकानासह आजूबाजूच्या दुकानांचे नुकसान झाले. पोलीस उपायुक्त डॉ. बसवराज तेली, सहायक आयुक्त राम माडूंरके, पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांनी घटनास्थळी भेट देऊन याबाबतची माहिती घेतली. (प्रतिनिधी)