पिंपरीत माथाडी कामगारांच्या त्रासामुळे औषध विक्रेत्यांनी दुकाने केली बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2020 07:03 PM2020-01-01T19:03:05+5:302020-01-01T19:11:55+5:30
माथाडी म्हणवून घेणाऱ्या काही जणांकडून पैशांची मागणी
पिंपरी : विक्रीचे साहित्य व औषधे वाहनातून आले असता त्यासाठी माथाडी म्हणवून घेणाऱ्या काही जणांकडून पैशांची मागणी करण्यात आली. त्यामुळे चिंचवड स्टेशन येथील दवा बाजारातील घाऊक औषध विक्रेत्यांनी बुधवारी सकाळी दुकाने बंद ठेवली होती. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी विक्रेत्यांची भेट घेऊन चर्चा केली. तसेच यापुढे कोणताही त्रास होणार नाही, याची ग्वाही देऊन आश्वस्त केले. त्यानंतर विक्रेत्यांनी दुकाने सुरू केली.
चिंचवड स्टेशन येथील दवा बाजारातील घाऊक विक्रेत्यांनी मागणी केलेली औषधे तसेच इतर साहित्य घेऊन वाहने दवा बाजारात बुधवारी सकाळी पोहचली. त्या वाहनांसोबत संबंधित ट्रान्सपोर्ट कंपनीकडून आलेले कामगार होते. ते कामगार औषधे तसेच विक्रीचे साहित्य उतरवत असताना काही जण तेथे आले. आम्ही माथाडी कामगार असून, हे साहित्य येथे उतरवायचे असल्यास त्याचे पैसे द्या, असे म्हणाले. ट्रान्सपोर्ट कंपनीच्या कर्मचाºयांनी दवा बाजारातील औषध विक्रेत्यांना याबाबत माहिती दिली. तसेच वाहनातून साहित्य आम्ही उतरवून देणार आहोत, त्यामुळे पैसे कशासाठी द्यायचे, असे म्हणून त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे वाद झाला. त्यानंतर ट्रान्सपोर्ट कंपनीने विक्रीचे साहित्य तसेच औषधे उतरवून न देता परत घेऊन गेले.
विक्रीचे साहित्य तसेच औषधे न मिळाल्याने विक्रेत्यांकडून संतप्त भावना व्यक्त करण्यात आल्या. तसेच माथाडी कामगार म्हणून त्रास देणाºयांबाबत योग्य निर्णय होईपर्यंत दुकाने उघडणार नसल्याची भुमिका व्यापाºयांनी घेतली. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली. त्यानंतर निगडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अन्सार शेख यांनी दवा बाजाराला भेट दिली. तेथील विक्रेत्यांशी चर्चा केली. विक्रेत्यांना यापुढे कोणाचाही त्रास होणार नाही, याबाबत खबरदारी घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर विक्रेत्यांनी दुकाने सुरू केली.
.................
पिंपरी-चिंचवड शहरात औषधांचे सुमारे ४०० घाऊक विक्रेते आहेत. त्यातील ११५ विक्रेते चिंचवड स्टेशन परिसरात व तेथील दवा बाजारात आहेत. या विक्रेत्यांना माथाडी म्हणवून घेणाऱ्या काही जणांकडून त्रास देण्यात येतो. तो थांबावा, अशी आमची मागणी आहे.
- संतोष खिवंसरा, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड केमिस्ट असोसिएशन.
.........................
औषध विक्रेत्यांशी चर्चा केली आहे. परिसरातील माथाडी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना याबाबत विचारणा करण्यात येणार आहे. त्यातील बोगस माथाडींवर योग्य कारवाई करण्यात येईल. - अन्सार शेख, सहायक पोलीस निरीक्षक, निगडी