पिंपरीत भरदिवसा दुकानाची तोडफोड; पैशांची मागणी करून अल्पवयीन मुलांनी केलं नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 01:03 PM2021-09-15T13:03:05+5:302021-09-15T13:03:47+5:30
तीन अल्पवयीन मुलांच्या विरोधात गुन्हा दाखल
पिंपरी : पैशांची मागणी करून चाॅपरने वार करून केले. तसेच दुकानातील काचा, पुतळ्यांची तोडफोड करून नुकसान केले. पिंपरी येथील डिलक्स चौकातील मिस्टर मॅड या कपड्यांच्या दुकानात सोमवारी (दि. १३) सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली.
कासिम अस्लम शेख (वय २६, रा. पिंपरी) यांनी याप्रकरणी मंगळवारी (दि. १४) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणी तीन अल्पवयीन मुलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मिस्टर मॅड या कपड्यांच्या दुकानात काम करीत होते. त्यावेळी आरोपी दुकानात आले. आम्हाला पैसे द्या, नाहीतर येथे धंदा करू देणार नाही, असे आरोपी म्हणाले. त्यानंतर लोखंडी चॉपरने फिर्यादीवर वार केले. तसेच फिर्यादीसोबत काम करणाऱ्या इसमांना जखमी केले. दुकानामधील डिस्प्ले काच, काऊंटरवरील काच व पुतळ्यांची तोडफोड करून आरोपींनी नुकसान केले. तोडफोड करून आरोपी पळून गेले. पिंपरीतील मुख्य चौकांपैकी एक असलेल्या डिलक्स चौकात भरदिवसा हा प्रकार घडल्याने परिसरात भितीचे वातावरण होते. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्याच्या आधारे पोलिसांकडून शोध सुरू झाला आहे.
पिंपरीत भरदिवसा दुकानाची तोडफोड; पैशांची मागणी करून अल्पवयीन मुलांनी केले मोठे नुकसान, गुन्हा दाखल.#pune#pimpripic.twitter.com/CfXzfunzSM
— Lokmat (@MiLOKMAT) September 15, 2021