कर्मचारी राहत असलेली दुकाने धोकादायक
By admin | Published: January 1, 2017 04:35 AM2017-01-01T04:35:15+5:302017-01-01T04:35:15+5:30
अग्निशामक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मतानुसार ज्या ठिकाणी छोट्या जागेत दुकान आहे, त्या दुकानातच कर्मचारी राहतात. अशी ठिकाणे आगीच्या घटनांना निमंत्रण देणारी ठरतात.
पिंपरी : अग्निशामक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मतानुसार ज्या ठिकाणी छोट्या जागेत दुकान आहे, त्या दुकानातच कर्मचारी राहतात. अशी ठिकाणे आगीच्या घटनांना निमंत्रण देणारी ठरतात. पुण्यात कोंढव्यात बेकरीला लागलेल्या आगीत सहा जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमधील बेकरी कितपत सुरक्षित आहेत, याचा आढावा घेतला असता, महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी ज्या ठिकाणी बेकरी अथवा दुकानातच कर्मचारी राहतात, अशी ठिकाणे आगीच्या घटनांना निमंत्रण देणारी ठरू शकतात, असे निरीक्षण नोंदवले आहे.
पुण्यातील कोंढवा येथे घडलेल्या दुर्घटनेचे कारणसुद्धा हेच असल्याचे अग्निशामक दलाचे अधिकारी किरण गावडे यांनी नमूद केले. ते म्हणाले, जसे पेट्रोल पंप, गॅस एजन्सी या ठिकाणी कधीही धोकादायक स्थिती उद्भवू शकते, तसे बेकरीचे नाही. अग्निशामक दलाच्या दृष्टीने धोकादायक आस्थापनामध्ये बेकरीचा समावेश होत नाही. बेकरीचा माल उत्पादन करण्यासाठी भट्टीचा वापर होतो. बहुतांशी हॉटेलमध्येही भट्टी असते. त्यामुळे अशा आस्थापनांमध्ये दक्षतेच्या उपायययोजना केल्याच पाहिजेत, असे बंधनकारक केले जात नाही, असेही अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
पिंपरी-चिंचवड परिसरात ‘निचे दुकान, उपर मकान ’ अशी परिस्थिती अनेक ठिकाणी आहे. छोट्या जागेत सुरू केलेल्या दुकानांमध्ये पोटमाळ्यावर कामगारांना झोपण्यासाठी जागा उपलब्ध करून दिलेली असते. अगोदरच कमी जागा, त्यात दुकानाच्या साहित्याबरोबर कामगारांच्या साहित्याची भर पडते. छोटेखानी दुकानात जागेच्या कानाकोपऱ्यांत वस्तू ठेवल्याने खोली भरगच्च होते. दुकान खाद्यपदार्थ तयार करण्याचे नसले, तरी राहणाऱ्या कामगारांसाठी तेथे रॉकेलचा स्टोव्ह अथवा गॅस उपलब्ध करून दिलेला असतो. कधी तरी त्या कामगारांपैकी कोणी हलगर्जीपणा दाखवला, तर दुर्घटना होण्याची शक्यता अधिक असते.
पिंपरी-चिंचवडमध्ये किराणा मालाच्या दुकानात कुटुंबासह राहणारे काही व्यापारी आहेत. मिठाईच्या दुकानांमध्ये अशीच परिस्थिती असते. गादी तयार करण्याची छोटी दुकाने अर्थात गादी कारखाने अशा ठिकाणी आगीच्या दुर्घटना घडण्यास पूरक परिस्थिती निमाण होते. त्या ठिकाणी त्या लोकांनी योग्य ती दक्षता घेणे आवश्यक आहे. दुकानात कामगारांना राहण्यास मुभा नसावी. कामगारांना राहण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था असावी, असे अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी सुचविले आहे. (प्रतिनिधी)
कुदळवाडी आगीच्या घटनांचे आगार
चिखली, कुदळवाडी परिसरात महिन्यात एकदा तरी आगीची घटना घडतेच. चिखली, कुदळवाडीतील भंगार मालाच्या दुकानांना मोठ्या स्वरूपात आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. भंगार मालाची तसेच लाकडी वस्तूंची गोदामे, दुकाने एकाला एक चिकटून आहेत. सुमारे बारा ते चौदा तास येथील आग आटोक्यात येत नाही. अग्निशामक दलाचे बंब, पाण्याचे कित्येक टँकर खाली करावे लागतात. या घटना वारंवार घडू लागल्या असताना, कोणत्याही दक्षतेच्या उपाययोजना केल्या जात नाहीत.