पिंपरी शहरात दोन महिन्यांनंतर दुकाने खुली ; रस्त्यांवर नागरिकांची गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 11:12 PM2020-05-22T23:12:36+5:302020-05-22T23:18:32+5:30
रस्ते गजबजले : फिजिकल डिस्टंन्सिंगचा फज्जा
पिंपरी : रूग्णसंख्येचा आलेख कमी असल्याने पिंपरी-चिंचवड शहराला रेडझोनमधून वगळले आहे. त्यामुळे शुक्रवार सकाळपासून बाजारपेठात गर्दी झाल्याचे दिसून आले. तब्बल दोन महिन्याने दुकाने उघडल्याने ग्राहकांची गर्दी झाली होती. त्यामुळे पहिल्याच दिवशी फिजिकल डिस्टंन्सिंगचा फज्जा उडाला आहे.
पिंपरी-चिंचवड शहराला रेडझोनमधून वगळण्याचा निर्णय १९ मे रोजी राज्य शासनाने घेतला होता. मात्र, तीन दिवसात मोठ्याप्रमाणावर रूग्णवाढ होत असल्याने आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी गुरूवारपर्यंत आढावा घेण्याचे निश्चित केले होते. याबाबत राज्य शासनाकडून पुन्हा मार्गदर्शन मागविले होते. त्यानुसार गुरूवारी रात्री दहाला रेडझोनमधून वगळल्याचा आदेश काढला आहे. त्यानुसार शहरातील दुकाने, कंपन्या खुल्या झाल्या आहेत.
.........................................
या गोष्टी बंदच राहणार?
शहरातील नागरिकांना केंद्रिय गृहमंत्रालयाच्या परवानगीशिवाय विमान, मेट्रो, रेल्वे प्रवास करता येणार नाही. लॉकडाऊनमुळे तसेच संभाव्य गर्दी व धोके लक्षात घेऊन यापुढेही शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, कोचिंग क्लासेस, हॉटेल, रेस्टॉरंट, सिनेमागृह, शॉपिंग मॉल, व्यायामशाळा, जलतरण तलाव, बार, सभागृह, नाट्यगृह, मनोरंजन पार्क, धार्मिक स्थळे बंद राहणार आहेत. तसेच राजकीय, सामाजिक, क्रीडा, मनोरंजन, सांस्कृतिक, शैक्षणिक उपक्रम, सभा संमेलने, धार्मिक कार्यक्रम पुढील आदेश येईपर्यंत बंद राहणार आहेत. शहरातील प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर सर्व बाजारपेठांमधील दुकाने आता सकाळी ९ ते सायंकाळी ५ या कालावधीत सुरू ठेवता येणार आहेत.
................................................................
मोबाईल, कपड्यांच्या दुकानासमोर गर्दी
शहरातील सर्वांत मोठे मार्केत पिंपरी कॅम्पमध्ये आहे. दोन महिन्यानंतर इथली दुकाने उघडल्याने त्याठिकाणी ग्राहकांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. पिंपरी मार्केटमधील एकाच बाजूची दुकान उघडल्याचे दिसून आले. कपड्यांच्या दुकानात दोन महिने कोणीही न फिरकल्याने जरीकाठी, हँडवर्क कपड्यांचे नुकसान झाले असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
..............................................
दुचाकीस्वारांकडून उल्लंघन
क्रीडा संकुले, सार्वजनिक वाचनालये, स्टेडियम सर्वसामान्य नागरिकांसाठी खुली होणार आहेत. मात्र या ठिकाणी वैयक्तीकरित्या करावयाचे व्यायाम प्रकार, एकट्याने खेळण्याचे खेळ, योगासने या बाबींना परवानगी दिली असली तरी पहिल्याच दिवशी नागरिक घराबाहेर पडल्याचे दिसून आले नाही. दुचाकीवरुन एकाच व्यक्तीला प्रवासाची मुभा असताना दोन व्यक्ती सर्रासपणे दुचाकीवरुन प्रवास करताना दिसत आहेत. त्यामुळे महापालिका आयुक्तांच्या आदेशाला अनेकांनी केराची टोपली दाखवली आहे. पहिल्याच दिवशी फिजिकल डिस्टंसिंगचा फज्जा उडाला.
.................
कोरोनापासून बचावासाठी दुकांनामध्ये वस्तू विकत घेताना सॅनिटायझर आणि मास्क बंधनकारक आहे. नियमांचे पालन करण्याची जबाबदारी नागरिक आणि दुकानदारांची आहे. त्याचबरोबर आरोग्यांची काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी. दुकानदारांनी या नियमाचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येणार आहे.
-श्रावण हर्डीकर, आयुक्त