टपाल कार्यालयांमध्ये एटीएम कार्डचा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 02:37 AM2018-07-26T02:37:47+5:302018-07-26T02:38:49+5:30
प्रशासन विभागाचे आधुनिक सोयी-सुविधा ग्राहकांना देण्याकडे दुर्लक्ष
पिंपरी : आधुनिकतेशी सांगड घालत टपाल कार्यालयानेही खातेदारांसाठी एटीएमची सुविधा उपलब्ध करून दिली. मात्र, या कार्डचा सतत तुटवडा भासत असल्याने ही सुविधा असूनही त्याचा खातेदारांना लाभ घेता येत नसल्याचे दिसून येते.
सध्या विविध बँकांनी ग्राहकांच्या सोईसाठी एटीएम सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ठिकठिकाणी एटीएम केंद्र उपलब्ध असल्याने अनेकजण एटीएम कार्डचा वापर करतात. त्यामुळे रोख रक्कम जवळ बाळगण्याची आवश्यकता भासत नाही. तसेच दुकानांसह अनेक ठिकाणी स्वाईप मशिन उपलब्ध असल्याने कॅशलेस व्यवहार करणेही शक्य झाले आहे. बँकांच्या बरोबरीने तीन वर्षांपूर्वी टपाल खात्यानेही ग्राहकांसाठी एटीएम सुविधा सुरू केली. मात्र, ही सुविधा सुरू करीत असताना हव्या तितक्या प्रमाणात कार्डची सेवा उपलब्ध करून न दिल्याने या सुविधेचा काहीही फायदा होत नसल्याचे दिसून येत आहे.
पिंपरी उपटपाल कार्यालयाकडून अद्यापपर्यंत केवळ १७४ एटीएम कार्ड वितरित केले आहेत. सुरुवातीला या कार्यालयाला कार्ड उपलब्ध झाले. त्यानंतर कार्ड आलेच नाहीत. त्यामुळे खातेदारांनाही कार्ड देणे शक्य
नाही. खातेदार कार्डची मागणी
करीत असतानाही कार्ड देणे शक्य होत नाही. त्यामुळे खातेदारांची गैरसोय होत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
पिंपरीतील उपटपाल कार्यालयात हजारो खातेदार असताना एटीएम कार्ड मात्र अवघी १७४ उपलब्ध झाली आहेत. मागणी करुनही हे कार्ड उपलब्ध होत नसल्याने अनेक खातेदार या सुविधेपासून वंचित राहत आहेत.
एटीएम कार्डअभावी होणारी गैरसोय टाळण्यासाठी टपाल कार्यालयाचे खातेदार असलेल्या खातेदारांना एटीएम कार्ड लवकरात लवकर उपलब्ध करुन द्यावेत, अशी मागणी होत आहे.