तडीपार गुंडाचा धिंगाणा
By admin | Published: November 28, 2015 12:41 AM2015-11-28T00:41:30+5:302015-11-28T00:41:30+5:30
गत महिन्यात घडलेल्या वाहन तोडफोडीच्या घटनांमुळे शहरवासीय दहशतीखाली असतानाच गुरुवारी पुन्हा एकदा तडीपार गुंडाने चिंचवड येथे वाहनांची तोड करीत दहशत माजविली
पिंपरी : गत महिन्यात घडलेल्या वाहन तोडफोडीच्या घटनांमुळे शहरवासीय दहशतीखाली असतानाच गुरुवारी पुन्हा एकदा तडीपार गुंडाने चिंचवड येथे वाहनांची तोड करीत दहशत माजविली. आनंदनगर येथे गुरुवारी रात्री साडेदहाला हा प्रकार घडला.
अविनाश पवार (रा.आनंदनगर चिंचवड) असे या तडीपार गुंडाचे नाव आहे. चिंचवड येथील आनंदनगर येथे गुरुवारी (दि. २६) रात्री साडेदहाच्या सुमारास अविनाश पवार व त्याच्या चार साथीदार हातात हॉकी स्टिक, लोखंडी हत्यार घेऊन या ठिकाणी आले. आनंदनगर परिसरात असलेल्या, तसेच रस्त्यावरील वाहनांच्या काचा फोडून तोडफोड करायला सुरुवात केली. दिसेल त्या वाहनाच्या काचा फोडल्या. यामध्ये ४ दुचाकी, रिक्षा, मोटार या वाहनांची तोडफोड करून मोठ्या प्रमाणात नुकसान केले. तोडफोडीनंतर हे टोळके तेथील रहिवासी आकाश अहिवळे यांच्या घरी गेले. त्यांच्या घरातील कपाट व टीव्हीची तोडफोड केली. एवढ्यावरच न थांबता या टोळक्याने दगडफेकही करून दहशत माजविली. दरम्यान, पोलीस येत असल्याचा सुगावा लागताच पवार व त्याचे साथीदार पसार झाले. पोलीस रात्रभर आरोपींचा शोध घेत होते.
अचानक घडलेल्या तोडफोडीत नुकसान झालेल्या वाहनमालकांनी व नागरिकांनी रस्त्यावर उतरुन पोलिसांना घेराव घालून घटनेचा निषेध व्यक्त केला. पोलिसांनी शांत करण्याचा प्रयत्न करुन आरोपींचा शोध सुरू असल्याचे सांगितले. नागरिकांनी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने महामार्गावर वाहतुकीची कोंडी होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या वेळी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणून ठिकठिकाणी पोलीस तैनात केले होते.
कोम्बिंग आॅपरेशन कशासाठी?
तीन दिवसांपूर्वीच पोलिसांनी विद्यानगर, आनंदनगर, दत्तनगर, रामनगर, मोहननगर, इंदिरानगर या भागात कोम्बिंग आॅपरेशन केले होते. या वेळी त्यांनी मारहाण, लूटमार करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेतले होते. नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण केल्यामुळे नागरिकांनीही पोलिसांचे पुष्पगु्च्छ देऊन स्वागत केले होते. कोम्बिंग आॅपरेशनमध्ये पोलिसांना पवारसारखे गुन्हेगार का सापडत नाहीत? मग कोम्बिंग आॅपरेशन कशासाठी, असा प्रश्न होत आहे. (प्रतिनिधी)